बघा माझा शर्ट इथे फाटलाय.., रावसाहेब दानवे यांनी भरसभेत का दाखवला फाटलेला शर्ट?

पुणे – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे फटकेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असतात. ते आपल्या भाषणात कोणता ना कोणता किस्सा सांगून उपस्थितांना हासायला लावतात. असाच एक किस्सा त्यांनी पुण्यातील सभेत भाषण करताना सांगितला. यावेळी त्यांनी भरसभेत फाटलेला शर्ट दाखवला.

दानवे म्हणाले, मी सगळी पदे उपभोगली. माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला भरभरून पदे दिली. केंद्रात तीनवेळा मंत्री झालो पण मी साधेपणा सोडला नाही. मी काल हैद्राबादला मित्राकडे गेलो होतो. तो म्हणाला, दादा तुमचा शर्ट फाटलाय तुम्ही खादीचा नवीन शर्ट घ्या. मी त्याला म्हणलं शर्ट फाटलाय म्हणून काय फरक पडतो? आता इथे तुम्ही सगळे पुण्याची माणसं आहेत, यात कुणी फाटक्या शर्टचा माणून येऊन बसलाय का? बघा माझा शर्ट इथे फाटला, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी भरसभेत मंचावर स्वत:चा फाटलेला शर्ट दाखवला.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीवेळचाही किस्सा सांगितला. निवडणुकी दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यावेळी शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर माझ्यासोबत होते. त्यावेळी लोणीकर म्हणाले, एकही सभा न घेता इतक्या मोठ्या फरकाने दानवे निवडून कसे आले. त्यावर खोतकर म्हणाले लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल, शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील, असा किस्सा दानवेंनी सांगितला.

तीन प्रभाग रचनेसंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, भाजपला फायदेशीर होईल अशी 3 चा प्रभाग रचना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे का करत आहेत हे तुम्ही शिवसेनेलाच विचारा, आम्ही सध्या प्रबळ विरोधकांच्याच भूमिकेत आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.