लखनौ -समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एस.पी.सिंह बघेल यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत ती लढत लक्षवेधी ठरली आहे.
अखिलेश प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी करहल मतदारसंघाची निवड केली आहे. अखिलेश यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ बघेल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळे करहलमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. केंद्र सरकारमध्ये कायदा आणि न्याय राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे बघेल आग्य्राचे खासदार आहेत.
याआधी त्यांनी उत्तरप्रदेशातही मंत्रिपद भुषवले. चार वेळा खासदार बनलेले बघेल एकेकाळी सपचे संस्थापक आणि अखिलेश यांचे वडील मुलायमसिंह यादव यांचे सुरक्षा अधिकारी होते. नंतर ते सपच्या तिकिटावर तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले. सप नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी बसपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना यश आले नाही. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.