अधिकाऱ्यांना दमदाटी करताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत कॅमेऱ्यात कैद 

जोधपूर : भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा एक व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री असणारे शेखावत अधिकाऱ्यांना धमकावताना दिसत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शेखावत यांनी भारतीय जनता पक्षातर्फे राजस्थानातील जोधपूर येथून उमेदवारी दाखल केली असून याच पार्श्ववभूमीवर ते जोधपूर परिसरात प्रचार सभांना संबोधित करीत आहेत. दरम्यान, रविवारी अशाच एका निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी शेखावत पोकरण येथे पोहोचले असता सरकारी अधिकाऱ्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचे चित्रीकरण करण्यात आले. मात्र आपल्या ताफ्यातील गाड्यांचे चित्रीकरण केल्याने केंद्रीय मंत्री असलेल्या गजेंद्र सिंह शेखावत यांचा पारा भलताच चढला.

यावेळी शेखावत यांनी आपले कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना दमदाटी करताना, “ही काही शेवटची निवडणूक नाही. पाच वर्षांनी हे सरकार गेल्यावर आम्ही सत्तेत येऊ! मी एक-एक अधिकाऱ्याची नाव टिपून ठेवलीत सत्तेत आल्या-आल्या त्यांना उलटं लटकवू.” अशी धमकी दिली.

अशातच आता अधिकाऱ्यांना दमदाटी करताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या शेखावत यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत असून राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेसतर्फे, ‘केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची कृती म्हणजे भाजपला लोकशाहीमध्ये स्वारस्य नसल्याचे उदाहरण आहे.’ असा आरोप लावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.