पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुढील आठड्यात पुण्यात बैठक घेऊन आढावा घेणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री गडकरी हे पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पुण्यासह पिंपरीतील विविध रस्ते विषयक कामकाजाचा ते आढावा घेणार आहेत. या बैठकीला शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भोसरीतून पुणे-नाशिक महामार्ग जात आहे. यासाठी महापालिकेने तब्बल 4 लाख चौरस फुटांवरची 415 अनधिकृत बांधकामे पाडली आहेत. फक्त एका शाळेचे आणि लहान 2 ते 3 मंदिरे कायम आहेत. या कारवाईमुळे आत्तापर्यंत लांडेवाडी कमान ते मोशी टोलनाका या दरम्यानचा रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा रस्ता 61 मीटर रूंद होणार असून भोसरी गावठाणामध्ये 45 मीटरचा रस्ता होणार आहे. दरम्यान, या महामार्गावरील पालिकेने अतिक्रमणांवर धडक कारवाई करून मार्ग मोकळा केला आहे. मात्र, रूंदीकरणाचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे भोसरी परिसरात या मार्गावर पुन्हा अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर भोसरी परिसरातील रूंदीकरणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा आहे.