नेवासा – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दुपारी १:३५ वाजताच्या सुमारास शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले आहे. यावेळी सुरक्षेच्यादृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी स्वागत केले. मंदिर परिसरात त्यांचे आगमन झाल्यानंतर उदासी महाराज मठात शाह यांनी अभिषेक करून चौथ-यावर जाऊन शनी मुर्तीवर तेल अभिषेक, पुष्पहार व पुजन करुन दर्शन घेतले.
यावेळी शाह यांनी देवस्थान सुविधा फलकांची पाहणी करून येथे रोज येणारे भाविक व येथे जमा होणाऱ्या देणगी विषयी माहिती जाणून घेतली. जनसंपर्क कार्यालयात अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर यांनी शनीप्रतिमा देऊन शहा यांचा सन्मान केला.
तसेच संपूर्ण तालुक्याच्यावतीने आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शहा यांचा सत्कार केला. शिंगणापूर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच येथील सर्व वाहनतळ देखील बंद करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.