नवी दिल्ली – शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठ सर्वांनी काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. तसेच काश्मीरचे नाव कश्यप असे होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.
नवी दिल्लीत जम्मू-काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले, कलम ३७० आणि ३५ए देशाला एक होण्यापासून रोखण्याच्या तरतुदी होत्या. संविधानसभेत या कलमांना बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे ही कलमे तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली होती.
स्वातंत्र्यानंतर या कलंकित अध्यायाला मोदी सरकारने हटवले आणि विकासाचे रस्ते उघडले. कमल ३७० नेच काश्मीरमधील तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम ३७० ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडले. त्यामुळे काश्मीर खो-यात दहशतवाद बोकाळला. मात्र आता कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत.
ब्रिटिश राजवटीत इतिहासात लिहिलेली आपल्या देशाची व्याख्या त्यांच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे चुकीची होती. जगभरातील राष्ट्रांचे अस्तित्व भू-राजकीयदृष्ट्या परिभाषित केले जाते. याउलट, भारत हे अद्वितीय आहे की त्याची एकता नेहमीच त्याच्या भौगोलिक सीमांवर आधारित नसून त्याच्या संस्कृतीवर आधारित आहे. जगातील भारत हे एकमेव राष्ट्र आहे जे ‘भौ-सांस्कृतिक’ देश आहे आणि संस्कृतीमुळे सीमा परिभाषित केल्या जातात, असेही ते म्हणाले.