केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एनएसजी कमांडोची सुरक्षा नाकारली

यापुढे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांकडूनच सुरक्षा पुरवण्यात येणार

नवी दिल्ली : काही दिवसांपुर्वी देशातील बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था सरकारकडून काढून घेण्यात आली होती. आता त्याच पार्श्‍वभुमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना देण्यात आलेली एनएसजी कमांडोची सुरक्षा नाकारली आहे. यापुढेही त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांकडूनच सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रीपदी अमित शहा यांची नेमणूक झाल्यावर गृह मंत्रालयातील सुरक्षा पुरवण्यासंदर्भातील समितीची बैठक झाली. त्यामध्ये अमित शहा यांच्या जीविताला असलेला धोक्‍याचा विचार करण्यात आला. अमित शहा यांना जुलै 2014 पासून केंद्रीय राखीव पोलिस दलांची (सीआरपीएफ) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पण गृहमंत्री पदावरील व्यक्तीला नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) यांच्याकडून सुरक्षा पुरविली जाते. याआधीचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एनएसजीकडून सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यामुळे अमित शहा यांनाही एनएसजी सुरक्षा पुरविली जावी, असे समितीच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

या संदर्भात कोणाकडून सुरक्षा पुरविली जावी, असे अमित शहा यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांकडूनच सुरक्षा पुरविण्याला पसंती दिली. त्यामुळे त्यांना सीआरपीएफकडूनच सुरक्षा पुरविण्यात येत आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल हे निमलष्करी दल म्हणून ओळखले जाते. या दलातील जवानांकडून अमित शहा यांना झेड प्लस स्वरुपाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तसेच या दलाकडून त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि त्यांच्या दौऱ्यांवेळीही सुरक्षा पुरविली जाते. केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून सुरक्षा घेणारे अमित शहा हे पहिलेच केंद्रीय गृहमंत्री आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.