केंद्रीय मंत्रिमंडळ झाले सक्रिय; उर्वरित मंत्र्यांनीही पदभार स्वीकारला

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळातल्या महत्वाच्या खात्यांच्या मंत्र्यांनी शनिवारीच पदभार स्वीकारल्यानंतर आज उर्वरित मंत्र्यांनीही आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारला. त्यामुळे आता “मोदी-2′ टीम सक्रिय झाली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांनी आज निर्माण भवन येथे पदभार स्वीकारला. निर्माण भवनपर्यंत सायकलवरुन जाऊन हरीत धरतीसाठी आपण हे चांगले कार्य केल्याचे सांगितले.

देशातल्या जनतेच्या आरोग्याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जनतेने सकारात्मक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करुन निरोगी राहावे यासाठी प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना धोरण मजबूत करण्यावर सरकार भर देईल.

“प्रधानमंत्री जन औषधी योजना’ म्हणजेच “पीएमजेएवाय’ पासून सध्या वंचित असलेल्या गरीबांचा समावेश या योजनेत व्हावा यासाठी योजनेच्या पात्रता निकषाचा विस्तार करण्याचा विचार करणार असल्याचे हर्ष वर्धन यांनी आयुष्मान भारत विषयी बोलताना सांगितले. सूचीमध्ये अधिक खाजगी रुग्णालयांच्या समावेशासाठी प्रयत्न आणि आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीतले अडथळे दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत भारत क्षय रोग मूक्त करण्यावर त्यांनी जोर दिला. कुष्ठरोग आणि काळा आजार यांच्या निर्मूलनासाठी एकत्रित आणि कालबद्ध कृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री म्हणून जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनीही आज पदभार स्वीकारला. या आधीच्या सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेले उत्तम कार्य आपण सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. देशातल्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधेच्या सर्वांगीण विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील असे ते म्हणाले.

केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री म्हणून अर्जुन मुंडा यांनी आज पदभार स्वीकारला तर आदिवासी कल्याण राज्यमंत्री म्हणून रेणुका सिंह यांनीही कार्यभार स्वीकारला.

केंद्रीय नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून राव इंद्रजित सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. 2022 पर्यंत नव भारताची निर्मिती करण्यासाठी काम करण्यावर आपला भर राहील. सर्वसमावेशी आणि सर्वांगीण विकासाला आपले प्राधान्य राहील असे ते म्हणाले. नीति आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी एक बैठक घेऊन या आधीच्या कार्याचा आढावा घेतला. राव इंद्रजित सिंह पाचव्यांदा खासदार झाले आहेत. हरियाणा विधानसभेत आमदार म्हणूनही ते चार वेळा निवडून आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.