शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली – आगामी पाच वर्षात केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प रालोआ सरकारने या अगोदरच जाहीर केलेला आहे. तो पूर्ण करण्यात येईल असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले.

कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी देशातील शेती परिस्थितीचा त्याचबरोबर हवामानाचा अंदाज यांचा आढावा घेतला. पाऊस कधी येणार आहे आणि त्याची वाटचाल कशी असेल या संबंधात काटेकोर लक्ष द्यावे आणि त्याची शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळावी याची व्यवस्था करावी, असे तोमर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचे स्वागत

मंत्रिमंडळाने पीएम किसान ही योजना देशातील सर्व साडेचौदा कोटी शेतकऱ्यांना लागू केली असल्याबद्दल उद्योजकांची संघटना असलेल्या फिक्कीने स्वागत केले आहे. ही योजना आता 87 हजार कोटीची झाली असून शेतकऱ्यांना पेन्शनही देण्यात येणार असल्याचे संघटनेने समाधान व्यक्‍त केले. केवळ उद्योग क्षेत्र वाढवून चालणार नाही तर शेती क्षेत्रही वाढण्याची गरज असल्याचे सरकारला वाटत असल्याचे या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. भारतीय कृषी क्षेत्रात मोठी क्षमता आहे मात्र, या क्षमतेचा आतापर्यंत वापर केलेला नाही. तो वापर करण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले असल्याची आठवण तोमर यांनी करून दिली. शेतीच्या मालाची बाजारपेठ विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उरलेला शेतीमाल शक्‍य तितक्‍या लवकर निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर नासाडी टाळण्यासाठी अन्नप्रक्रिया हा वेगळा विभाग कार्यरत आहे. त्यामुळे शेती उत्पादनाचा नाश होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.