अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा मृत्यू

आळेफाटा (प्रतिनिधी) – नगर कल्याण महामार्गावर पिंपरीपेंढार गावच्या हद्दीत असलेल्या साईनगर येथे गुरुवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

जुन्नर तालुका हा बिबट्या प्रणवक्षेत्र असलेला तालुका आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या बिबट्या प्रणव क्षेत्रात कायमच बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घडत असतात. या घटनांबरोबरच बिबट्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरी पेंढार येथील साईनगर शिवारातील राणबाबा मंदिराजवळ नगर कल्याण महामार्ग पार करत असताना अंदाजे पाच ते सहा वर्ष वयाच्या एका नर जातीच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

या बिबट्यावर आळे येथील वनखात्याच्या कार्यालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वन खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. यापूर्वीही याच महामार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तर पुणे-नाशिक महामार्गावर कांदळी गावच्या हद्दीत पण बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू होत असल्यामुळे बिबट्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.