संयुक्त राष्ट्र – करोना विरोधातील लस जगभरात सर्व गरजवंतांना उपलब्ध व्हावी, यासाठी ही लस खरेदी करून सर्वांपर्यंत योग्य वितरण करण्यासाठी ‘युनिसेफ’ने पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. ही लस जेंव्हा विकसित होईल, तेंव्हा सर्व देशांना सुरक्षित, तात्काळ आणि सम प्रमाणात उपलब्ध व्हावी, यासाठी ‘युनिसेफ’ने हा पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.
‘युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन फंड’च्या माध्यमातून जगभरात सर्वात जास्त प्रमाणात लस खरेदी केली जाणार आहे. दरवर्षी सुमारे 100 देशांमधील नियमित लसीकरणासाठी वेगावेगळ्या औषधांचे तब्बल 2 अब्ज डोस ‘युनिसेफ’च्यावतीने खरेदी केले जातात.
सध्या करोनाच्या लसीबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन प्रगतीपथावर आहे. काही देशांमधील करोना लसीची मानवी चाचणीही सुरू आहे. ‘युनिसेफ’च्यावतीने ‘रिव्होल्व्हिंग फंड ऑफ द पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायजेशन'(पाहो) या संघटनेबरोबर सहकार्य करण्याचे ठरवले आहे. या सहकार्यातूनच ‘कोविड-19’विरोधी ‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सीन फॅसिलिटी’ या लसीची खरेदी केली जाणार आहे.
जगभरातील कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यम उत्पन्न गटातील 92 देशांसाठी ही लस खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी ‘युनिसेफ’ने जागतिक आरोग्य संघटना, गावी द व्हॅक्सीन अलायन्स, द कोअलॅशन फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स, पाहा, जागतिक बॅंक, बिल ऍन्ड मेलिंडा गेटस फाउंडेशन आणि अन्य भागीदार संस्थांबरोबर सहकार्य केले आहे.