न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी म्हणजेच यु एन एफ पी ए या संस्थेने आपला एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालातील निष्कर्षाप्रमाणे जगातील पन्नास टक्के महिलांचा आपल्या शरीरावर अधिकार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या अहवालाचे शीर्षक ‘माझे शरीर माझे स्वतःचे आहे’ असे असून या संशोधनात जगातील सत्तावन देशातील महिलांचा अभ्यास करण्यात आला महिलांवर विविध प्रकारची नियंत्रणे आहेत त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो अशा काही बाबी या अहवालात समोर ठेवण्यात आला आहेत.
शारीरिक संबंध ठेवणे किंवा गर्भ नियंत्रण याबाबतीत महिलांवर अनेक नियंत्रणे लादली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. याबाबत निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य नाही. आपल्याच शरीराशी संबंधित निर्णय घेताना महिलांना स्वातंत्र्य दिले जात नाही. कोणतीही भीती न बाळगता महिला निर्णय घेऊ शकत नाहीत असेही या अहवालात म्हटले आहे.
त्यांना निर्णयाबाबत कोणतीही स्वायत्तता नसल्याने त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचाही निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. जगातील अनेक देशांमधील कायदेही महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.