मुंबई : भांडुपमधील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 च्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे.
ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचे महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केले.