दुर्दैवी! झारखंडमध्ये ‘कर्म पूजा’ उत्सवादरम्यान सात मुलींचा बुडून मृत्यू

लातेहार : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात ‘कर्म पूजा’ उत्सवादरम्यानएक दुर्दवी घटना घडली आहे.  एका खेड्यातील तलावात बुडून सात मुली मरण पावल्या असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

‘कर्म’ हा निसर्गपूजेशी संबंधित झारखंडमधील मोठा उत्सव असून, तो प्रामुख्याने आदिवासी अतिशय उत्साहात साजरा करतात. पूजेनंतर या मुली विसर्जनासाठी गेल्या असताना बालूमाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुकरु खेड्यात ही दुर्घटना घडली.

जिल्ह्याचे उप विकास आयुक्त शेखर वर्मा यांना या घटनेबद्दल चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त अबू इम्रान यांनी दिली. या दुर्घटनेचे वृत्त पसरताच उत्सवाचे सुतकी वातावरणात रूपांतर झाले. अनेक घरांतून शोकाकुल कुटुंबीयांचा विलाप ऐकू येत होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खेड्यातील १० मुलींचा एक गट ‘करम डाली’ विसर्जनासाठी तलावावर गेला असताना त्यांच्यापैकी दोघी बुडू लागल्याने मदतीसाठी आरडाओरड करू लागल्या. एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यापैकी सातजणी खोल पाण्यात बुडाल्या. बचावलेल्या इतर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. या मुलींच्या किंकाळ्या ऐकून गावकरी त्यांच्या बचावासाठी धावले.

४ मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर तिघींनी बालूमाथ आरोग्य केंद्रात नेत असताना प्राण सोडला. जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि लातेहारचे खासदार सुनील सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वप्रकारे मदत केली जाईल, असे लातेहारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९८ वरील बालूमाथ- चत्रा मार्ग रोखून धरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.