लखनौ – देशात करोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वच वयोगटातील रुग्ण करोनाचा शिकार होत आहेत. त्यात आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडत असल्यामुळे अनेकांना आपल्या जीवाशी मुकावं लागत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर आणि व्हेंटीलेटरसाठी अक्षरश: झगडावं लागत आहे. त्यातच लखनौमध्ये व्हेंटीलेटरअभावी एका डॉक्टरचा मृत्यू झालंच समोर आलं आहे.
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीला डॉक्टरांना देखील सामोरं जावं लागत आहे.
प्रयागराज येथे ८५ वर्षीय डॉक्टर जे.के. मिश्रा यांचं करोनाने निधन झालं. करोनाचं निदान झाल्यानंतर त्यांना ते जेथे काम करत होते, त्याच स्वरुप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांना जेव्हा व्हेंटीलेटरची अवश्यकता होती, तेव्हा त्यांना ते मिळू शकलं नाही. त्यामुळे पत्नीच्या डोळ्यावर डॉ. मिश्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे डॉ.मिश्रा यांनी या रुग्णालयात ५० वर्षे रुग्णांची सेवा केली होती. तिथेच त्यांचा व्हेंटीलेटरअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.
एकूण १०० व्हेंटीलेटर रुग्णालयात होते. पण मिश्रा यांच्या आधी दाखल झालेल्या रुग्णांना ते देण्यात आले. कोणत्याही रुग्णाचा व्हेंटीलेटर काढून देणे शक्य नव्हतं, असं रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं.