टोरंटो : कॅनडाच्या टोरंटोमध्ये भीषण अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर यांच्या जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे भारतीय दुतावासाने स्पष्ट केले आहे.
भारताचे कॅनडामधील राजदूत अजय बिसारीया यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. “कॅनडामधील हृदयद्रावक घटना : शनिवारी टोरंटोजवळ झालेल्या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती आम्ही सद्भावना व्यक्त करतो. भारतीय अधिकारी मरण पावलेल्या व्यक्तींच्या मित्रांच्या संपर्कात असून त्यांना मदत करत आहेत,” असे अजय बिसारीयांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Deeply mourn the passing away of 5 Indian students in Canada. Condolences to their families. Pray for the recovery of those injured. @IndiainToronto will provide all necessary support and assistance. https://t.co/MAkMz0uwJ7
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 14, 2022
देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही ट्विटरवरुन या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच भारतीय दुतावासाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य या मृतांच्या जवळच्या व्यक्तींना केले जाईल असे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरप्रीत सिंग (२४), जसपींदर सिंग (२१), करणपाल सिंग (२२), मोहित चौहान (२३) आणि पवन कुमार (२३) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजन माँटेरिअल आणि ग्रेटर टोरांटो परिसरामधील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत होते.