रेल्वेखाली सापडून दोघांचा दुर्देवी मृत्यू

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरात दोन घटनांमध्ये धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. कासारवाडी येथे झालेल्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर पिंपरी डेअरी फार्मजवळ एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी (दि.17) दुपारी रेल्वेखाली सापडून नितीन लक्ष्मण नेटके (वय 39, रा. भोसरी) या व्यक्‍तीचा मृत्यू झाला. पिंपरी रेल्वे पोलीस चौकीतील हवालदार बाळासाहेब साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुमारास नितीन हे कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ लोहमार्ग ओलांडत होते. त्यावेळी आलेल्या लोकलखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. नितीन यांच्याजवळ आधारकार्ड व इतर कागदपत्रे सापडली. या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. ते एका खासगी कंपनीत वेल्डर म्हणून कामाला होते. याबाबत पिंपरी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मंगळवारी (दि.17) सकाळी डेअरी फार्म, पिंपरी येथे प्रतिक्षा गौतम माने (वय 20, रा. जयभीमनगर, दापोडी) या तरुणीचा मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रतिक्षा या डेअरी फार्म, पिंपरी येथे लोहमार्ग ओलांडत होत्या. त्यावेळी आलेल्या लोकलखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. प्रतिक्षाजवळ महाविद्यालयाचे दप्तर आणि मोबाईल सापडला. त्यामुळे तिची ओळख पटली. प्रतिक्षा दापोडी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.