मुंबई : मराठी अभिनेत्री पूजा झुंजार हिचा रुग्णवाहिकेअभावी प्रसूतीनंतर दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेत पूजाच्या नवजात बालकाचाही मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
जर वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर पूजाचे प्राण वाचले असते असे दु:ख तिच्या कुटूंबियांनी व्यक्त केले आहे. पूजाला प्रसूती कळा सुरु झाल्याने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल करण्यात आले होते.
पूजाने मुलाला जन्म दिला मात्र ते काही मिनिटांतच दगावले. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. तिला तातडीने हिंगोलीमधील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिला. हे रुग्णालय 40 किलोमीटर लांब होते.
मात्र पूजाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. अखेर अनेक प्रयत्न करून तिच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिकेची सोय केली. मात्र वाटेतच पूजाचा दुर्दैवी अंत झाला. यासाठी प्रशासनाच्या ढीसाळ कारभारास पूजाच्या नातेवाईकांनी जबाबदार धरले आहे. पूजाने दोन मराठी चित्रपटांत काम केले आहे. गर्भवती असल्यानं तिनं काही काळ चित्रपटसृष्टीतून विश्रांती घेतली होती.