बीड – घरावर तिरंगा ध्वज लावताना विजेचा धक्का लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगाव येथे घडली आहे. मुक्तार आस्कोद्दीन शेख (वय 25) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
मुक्तार हा आभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तो पत्राच्या घरात राहतो. देशभर सुरु असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यासाठी मुख्तारनेही तिरंगा ध्वज खरेदी केला होता. तो आपल्या पत्राच्या घरावर ध्वज लावत असताना स्टीलच्या राॅडचा स्पर्श तेथिल विजेच्या तारांना झाला आणि विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (13 ऑगस्ट) रोजी दुपारी घडली. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता.
मुक्तार आणि त्याचे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. मुक्तारच त्यांच्या घराचा महत्वाचा आधार होता. मात्र मुक्तारच्या या अपघाती निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.