पाथर्डी: बीड मधील नवगण राजुरी ते पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर फाटा या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाथर्डी तालुक्यातील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडण्याचा परवाना बीड येथील वनविभागाने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित ठेकेदाराने पाथर्डी तालुक्याच्या हद्दीत चींचपुर इजदे येथील शेतकऱ्याची तीन झाडे बेकायदेशीरपणे तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यासंदर्भात आजिनाथ खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासंदर्भात पाथर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी ते पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर फाटा पर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता पाथर्डी तालुक्याच्या हद्दीत येतो. रुंदीकरणासाठी रस्त्याच्या कडेच्या झाडांची सर्रास कत्तल करण्यात आली आहे. या संपूर्ण रस्त्याच्या कडेला सुमारे 1559 झाडे असून ही सर्व झाडे तोडण्याचा परवाना हा रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बीड येथील वनविभागाने दिला आहे.
प्रत्यक्षात यापैकी काही झाडे ही पाथर्डी तालुक्याच्या हद्दीत असल्याने ही झाडे तोडण्याचा परवाना हा पाथर्डी येथील वनविभागा कडून घेणे अपेक्षित असताना कायदा धाब्यावर बसवून तो बीड वनविभागाने दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील चींचपुर इजदे येथील आजिनाथ खेडकर यांच्या शेतातील बाभूळ, चिंच व निंब अशी तीन झाडे ठेकेदाराने गुपचुप तोडली. झाडे तोडण्याची माहिती खेडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी ठेकेदाराला जाब विचारला असता उपस्थित कामगारांनी संबंधित झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तोडल्याचे सांगितले. खेडकर यांनी संबंधित अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून घेतले मात्र त्यांयांनी कानावर हात ठेवले.
बीड जिल्हा वन विभागाने रस्त्याच्या मध्यापासून 12 मीटर अंतरावरील झाडे तोडण्याची परवानगी दिली असतानाही संबंधित ठेकेदाराने खेडकर यांची 14 मीटर अंतरावरील झाडे तोडली. याबाबत शेतकरी खेडकर यांनी पाथर्डी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निर्भवणे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याचबरोबर पाथर्डी पोलीस ठाण्यात नुकसान केल्याबाबत गुन्हा दाखल केला.
पाथर्डी तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा करत तीन मजूर, एक टेम्पो व दोन कटर मशीन ताब्यात घेतले आहे. पाथर्डी वन विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या पंचनाम्यात संबंधित झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदाराने स्वतःच्या हितासाठी बीड वन विभागाकडून मिळालेल्या परवानगीच्या नावाखाली जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल केली आहे.
शेतकऱ्याने केली तक्रार दाखल
शेतकरी आदिनाथ खेडकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेकायदेशीरपणे झाडे तोडणारा ठेकेदार राजुभाई आह्माउँद्दीन शेख (रा. बिड), कामगार अमर अकबर शेख, मोहम्मद सुलेमान पठाण, शेख नजीर बाबा (रा. बाशीनाका बीड, ता.जि.बीड) यांचे विरोधात बेकायदेशीरपणे झाडे तोडून नुकसान केलेबाबद गुन्हा दाखल केला आहे.