बलिया – करोनामुळे रोजगार गेले आहेत. ज्यांना नौकरी आहे, त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. देशाचा जीडीपी घसरला आहे. अनेकांकडे उत्पन्नाचे ठोस साधन नाही. जे मिळतेय तेही अत्यंत तुटपुंजे. अशात जर तुमच्या बॅंक खात्यात अचानक दहा कोटी रूपये जमा झाले तर काय कराल?
हा विनोदी मेसेज नाही. एका 16 वर्षीय मुलीला खरेच मोबाइलवर असा मेसेज आला असून ती व तिची आई दोघीही हादरल्या आहेत. बॅंकेकडे गेल्यावर आमचा काही संबंध नाही असे म्हणत बॅंकेने हात वर केल्यावर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
बलिया येथील या 16 वर्षीय मुलीचे एका बॅंकेत खाते आहे. तिचे वडील अहमदाबाद येथे एका गॅरेजमध्ये काम करतात. ती आणि आई अशा दोघीच येथे राहतात. 21 तारखेला तिला मोबाइलवर 9 कोटी 99 लाख 4 हजार 736 रूपये जमा झाल्याचा मेसेज आल्यावर ती गोंधळली. तीने तडक आईसोबत पोलीस ठाण्याचा रस्ता धरला.
पोलिसांनी यासंदर्भात विचारणा केल्यावर दोन वर्षांपूर्वी कानपूरमधील एका व्यक्तीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी म्हणजे 2018 मध्ये आपण बॅंकेत खाते उघडले. स्वत: ही मुलगी कधीच शाळेत गेलेली नाही. मात्र सही करायचे शिकली आहे. त्यामुळे आपण सही करूनच हे खाते उघडले असे तिने सांगितले.
खाते उघडल्यावर त्याच व्यक्तीचा फोन आला होता. त्याने एटीएम कार्ड येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तसे कार्ड आलेही. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर तिने ते कार्ड रजिस्टरने पाठवले. त्याचा पिन नंबरही दिला. सोबत आधार कार्डची झेरॉक्सही पाठवली. मात्र नंतर त्याचा फोन अजुन आला नसल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, त्या मुलीला दिलेल्या फोनवर पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो फोनच लागत नाही. संबंधित बॅंकेत याबाबत चौकशी केली असता, या खात्यावर बरेच व्यवहार झाले असल्याचे बॅंकेच्या लोकांनी सांगितले. मात्र आपल्याला याबाबत काही कल्पना नसल्याचे मुलीचे म्हणणे आहे. आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचे सांगत बॅंकेने हात वर केले आहे.
पिन नंबर विचारून अथवा अन्य माध्यमातून लोकांच्या खात्यातून हजारो रूपये गायब होत असल्याच्या घटना दररोज घडत आहेत. मात्र खात्यावर कॅश जमा होण्याची घटना अत्यंत दुर्िर्मळ प्रकारात मोडते. तेही दहा कोटी रूपये जमा झाले आहेत, मात्र त्यावर कोणाचाच क्लेम नाही. पैसे जमा झाल्यामुळे डोकेदुखी वाढल्याचा प्रकार या युवतीच्या बाबतीत घडला असून ती व तिची आई दोन्ही सध्या टेन्शनमध्ये आहेत.