- खाकीतील दलालांच्या जीवावर दरवाजे सताड मोकळे
- एस्कॉर्ट, मसाज पार्लर, हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय जोमात
– संजय कडू
पुणे – लॉकडाऊनमध्ये अनैतिक आणि बेकायदा धंद्यांवरही कुऱ्हाड कोसळली. यामुळे करोनामुळे का होईना, पण कायदा-सुव्यवस्था अबाधित होती. अनलॉक सुरू होताच जनजीवन सुरळीत झाले, पण दुसऱ्या बाजूला अनैतिक व बेकायदा धंदेवाईकांनी डोके वर काढले आहे. यामध्ये एस्कॉर्ट, मसाज पार्लर, हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची दारे सताड उघडी झाली. विशेष म्हणजे, अशा व्यवसायांवर कारवाईची जबाबदारी सामाजिक सुरक्षा विभागाकडे आहे. पण, हे धंदे सुरू करायला काही कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. “तुम्ही धंदे सुरू करा, कारवाई होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो’ असे आश्वासनही दिले गेले आहे.
असा चालतो व्यवहार
अनैतिक व्यवसायाचे सर्वाधिक जाळे मुंबई पाठोपाठ पुण्यात पसरले आहे. महामार्गामुळे दोन्ही शहरे जवळ आली आहेत. याचा फायदा अनैतिक व्यवसायाच्या दलालांनाही झाला आहे. मुंबईतून मॉडेल्स, बी ग्रेड चित्रपटांच्या अभिनेत्री, तसेच परदेशी तरुणींची ने-आण पुण्यात केली जाते. हे दलाल विशेषत: “वीकेन्ड’ला मोठ्या प्रमाणात मुलींना पुण्यात घेऊन येतात. हिंजवडी, बाणेर, पाषाण अशा ठिकाणी त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली जाते.
सोशल मीडियाद्वारे ग्राहकांशी संपर्क साधला जातो. तर दुसरीकडे गल्लोगल्ली मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय फोफावला आहे. पूर्वेकडील राज्यांतील मुली बॅंकॉक आणि थायलंडच्या असल्याचे भासवले जाते. तर, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील गरीब मुलींना नोकरीच्या आमिषाने फसवून आणून थोडीफार इंग्रजी भाषा शिकवून मॉडेल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थीनी भासवून ग्राहक पटवले जातात. या व्यवसायातील दलाल आणि खाकी वर्दीत काही चुकीची कामे करणाऱ्यांच्या साटेलोट्याने हे सर्व प्रकार सुरू आहेत.
आता झाडाझडतीची वेळ
अनलॉक, तत्कालिन पोलीस आयुक्तांची बदली, नवीन पोलीस आयुक्तांनी सूत्रे स्वीकारणे, पोलिसांची बदल्यांची गडबड ही संधी साधत अनैतिक व बेकायदा व्यावसायिकांना संधी मिळाली. त्यांनी पुन्हा डोके वर काढले. स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली दुकाने भाड्याने घेऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये धंदे बंद केले होते. यामुळे खाकीतील दलालांची “वरकमाई’ घटली. पण, आता खाबुगिरी करणाऱ्यांनी धंदेवाल्यांना कारवाई न करण्याचे आश्वासन परस्पर देत प्रोत्साहन दिले आहे. ज्यांनी धंदे सोडून दिले, त्यांच्या जागी नवीन व्यक्तींनाही बसवण्याचा “खेळ’ खेळला जात आहे.
दलालांना रोखण्याचे आव्हान
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूत्रे स्वीकारताच आढावा घेत गुन्हेगारांवर फास आवळायला सुरुवात केली आहे. तडिपारी, प्रतिबंधात्मक कारवाई, स्थानबद्धता, सराईतांची हजेरी असा धडाका सध्या सुरू आहे. मात्र, त्यांचे प्राधान्य शरिराविरुद्धचे गुन्हे आणि जबरी चोरी करणाऱ्यांकडे आहे. यामुळे अनैतिक व्यवसाय करणारे आणि त्याला खात्यातूनच प्रोत्साहन देणारे ही संधी साधइहीत आहेत.
लॉजचे दर घटले
लॉज व्यावसायिकांना लॉकडाऊनचा जबर फटका बसला. यातील अनेक जण अजूनही सावरलेले नाहीत. अनलॉकनंतरही ग्राहक दुर्मीळ आहेत. यामुळे अनेकांनी लॉजचे दर कमी केले आहेत. यातील काही लॉजचालक अनैतिक दलालांच्या संपर्कात राहून आर्थिकदृष्ट्या सावरत आहेत. तर, वर्षानुवर्षे अनैतिक धंदेवाल्यांच्या जीवावर लॉजचा व्यवसाय करणारे आता पुन्हा सावरू लागले आहेत.