असंघटीत कामगारांत बेरोजगारीचा ‘व्हायरस’

लाखो लोकांवर उपासमारीची वेळ : कष्टकरी, शेतमजूर हतबल


काम मिळणे अशक्‍य; छोटे व्यावसायिक चिंतातूर

पुणे – देशातील सर्वच घटकांना करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बसू लागला असला, तरी सर्वाधिक दयनीय अवस्था झाली आहे, ती राज्यातील शेतमजूर, छोट्या-मोठ्या व्यवसायांतील रोजंदारी मजूर, कामगार, हमाल, माथाडी कामगार, छोटे उद्योग-व्यावसायिक, त्यावर अवलंबून असणारे कामगार, घरकामगार या क्षेत्रातील असंघटितवर्गाची. कमवा आणि खा या वर्गात मोडणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या या लोकांवर करोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे.

राज्यात तब्बल 31 लाख 42 हजारांहून अधिक किरकोळ उद्योग-व्यावसायिक आहेत. यामध्ये छोटी हॉटल, चहाच्या गाड्या, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांचे गाडे, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते, ढाबे, पंक्‍चर काढणारे, मेकॅनिक, शीतपेय विक्रेते, बेकर्स, भाजीपाला विक्रेते, स्पेअरपार्ट विक्रेते, वेगवेगळ्या दुरुस्तीची कामे करणारे, मिठाईवाले, लॉटरी विक्रेते अशांसारखे हजारो प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांचा यात समावेश होतो. जवळपास चलन मंदावल्यामुळे या छोट्या व्यावसायिकांचे दुकानही बंद पडल्याने हलाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता लागून आहे.

कारखान्यांचे शटरही डाउन
करोनामुळे राज्यातील हजारो कारखान्यांचे शटरही डाऊन झाले आहे. याच कारखान्यांमध्ये रोजंदारीची किंवा माथाडी स्वरूपाची कामे करणाऱ्या हजारो कामगारांवर मात्र रोजीबरोबरच रोटीही बंद झाली आहे. एकूणच राज्यातील हातावरची पोटे असलेल्या लोकांच्या पोटावरच करोनाने आघात करायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

राज्यात 1 कोटीवर शेतमजूर
राज्यात सुमारे 1 कोटी 10 लाखांहून अधिक शेतमजुरांची संख्या आहे. उन्हाळ्यामुळे शेतीतील मजुरीची कामे कमी झाली आहेत. अशातच करोनामुळे शेतीतील कामांवरही परिणाम झाला आहे. शेतकरीही आजची कामे उद्यावर ढकलत आहेत. ऊसतोडणीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. शिवारा-शिवारांमध्येही शुकशुकाट जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतमजुरांना काम मिळणे अशक्‍य झाले आहे.

बांधकाम कामगारांवरही उपासमारीची वेळ
राज्यात सुमारे 20 लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगार आहेत. सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असतानाच करोनामुळे सुरू असलेले बांधकाम प्रकल्पांचे कामही थांबवले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांवरही उपासमारीची वेळ आलेली दिसत आहे. राज्यात घरकाम करणाऱ्या कामगारांची संख्या 9 लाख 91 हजारांवर आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. काम करणाऱ्या घरातील उरलेसुरले अन्न आणि थोडीफार रोख रक्कम हीच या वर्गाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते. मात्र, करोना संपर्काच्या धास्तीने हजारो घरांमधील घरकामगारांचा घरातील प्रवेशच जणूकाही वर्ज्य झाला आहे. अनेकांची जमापूंजीही संपत आली आहे. त्यामुळे पुढील 8-15 दिवसांनंतर पोट कसं भरायचं, हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.