कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जून महिन्यात 6.5 टक्के इतकेच असल्याचे सीएमआयईच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेरोजगारीचा हा दर देशातील सर्वात कमी दर आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. देशाचा एकूण राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 11 टक्के इतका असताना बंगालचा हा दर केवळ 6.5 टक्के इतकाच आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, करोनामुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक स्थितीशी मुकाबला करण्याचे जे प्रभावी धोरण आमच्या सरकारने राबवले आणि चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर ज्या त्वरेने आम्ही उपाययोजना केल्या, त्यामुळेच बेरोजगारीचा दर कमी राखण्यात आम्हाला यश आले असे त्या म्हणाल्या. भाजपशासित हरियानात बेरोजगारीचा दर 33.6 टक्के इतका असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. सीएमआयईचा हा अहवाल बुधवारी प्रकाशित करण्यात आला आहे. मे महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर तब्बल 23.5 टक्के इतका होता तो जून महिन्यात कमी होऊन 11 टक्के इतका झाला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.