आधी बेरोजगारी, मग रोजंदारी…आता मजुरी!

करोनामुळे पगार नाही : हंगामी सहायक प्राध्यापकांनी थेट पेशाच सोडला

– डॉ. राजू गुरव

पुणे – करोनाचे संकट वाढत चालल्याने वरिष्ठ महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामुळे तासिका (सीएचबी) तत्वावरील किंवा हंगामी सहायक प्राध्यापकांचे मानधन, पगार बंदच असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न संबंधित हंगामी प्राध्यापकांपुढे निर्माण झाला आहे. काहींनी तर प्राध्यापकीचा नाद सोडून शेती व इतर व्यवसाय, विविध कंपन्यांमध्ये रोजंदारीवर नोकरीचा मार्ग स्वीकारला आहे.

बहुसंख्य विद्यापीठ, महाविद्यालयांत गेल्या काही वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची भरतीच झालेली नाही. यामुळे बरीचशी पदे रिक्त आहेत. सेट, नेट, पीएच.डी. झालेल्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याप्रमाणात नोकऱ्यांचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवीन भरतीला शासनाने बंदी घातली आहे. सरकार बदलले असले, तरी प्रलंबित प्रश्‍नांची अवस्था मात्र “जैसे थे’ आहे.

एकीकडे कायम सेवेतील प्राध्यापकांना गलेलठ्ठ पगार, तर दुसरीकडे तासिका आणि हंगामी प्राध्यापकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाला याचे काहीच गांभीर्य नाही, हे विशेषच आहे. उमेदवारांनी शासनाला विविध मागण्यांची निवेदने पाठवण्याचा धडाकाही लावला आहे.
तासिका तत्वावरील व हंगामी प्राध्यापकांना लॉकडाऊनच्या गेल्या चार महिन्यात आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अद्यापही त्यांना नवीन नियुक्‍त्यांचे आदेशही देण्यात आलेले नाही. “आम्ही जेव्हां बोलावू तेव्हाच या,’ अशा सूचनाही काही महाविद्यालयांनी दिल्या आहेत. काही महाविद्यालयांनी नवीन उमेदवारांना घेण्याचा घाट घातल्याचे काही सहायक प्राध्यापकांनी सांगितले आहे.

नियमित मानधन मिळण्याची अपेक्षा
अनुदानित महाविद्यालयांतील “सीएचबी’च्या सहायक प्राध्यापकांची नियमानुसार नियुक्ती करुन त्यास विद्यापीठांची मान्यता घेतल्यास संबंधितांचे मानधन उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय अदा करते. मात्र, ते दरमहा दिले जात नाही. दिवाळीपूर्वी आणि मार्चमध्ये असे दोन वेळा एकत्रित मानधन देण्यात येते. महाविद्यालयांनी दरमहा मानधनाचे प्रस्ताव तयार करुन पाठवल्यास त्याचा नक्कीच सकारात्मक विचार होऊ शकतो. यामुळे हंगामी प्राध्यापकांनी दिलासा मिळू शकतो, असे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.