कोलकाता – भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून संघाने उत्तम कामगिरी केली. २०२३ साली कसोटी विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने धडक दिली होती. मात्र या दोन्ही विश्वचषकात आपल्याला अपयश आले. त्यानंतर काही महिन्यातच २९ जून रोजी भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला असून तो पुन्हा एकदा आयपीएलकडे वळण्यास सज्ज बनला आहे. भारतीय संघानंतर तो कोलकाता नाईट राडर्सशी (केकेआर) जोडला जाण्याची चर्चा सुरू आहे. केकेआरचा संघाचा मेटाँर गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्यामुळे या जागेवर द्रविडची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोलकाता नाईट राईडर्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये बहारदार कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. मागचे दोन सीझन केकेआरची कामगिरी सुमार होती. यावर्षी गौतम गंभीर केकेआर संघाचा मेटाँर झाल्यानंतर केकेआर संघाने तिसऱ्यांदा आयपीएल चषक जिंकण्याची किमया करून दाखविली. द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरने भारतीय संघाचा प्रशिक्षकपदावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी बीसीसीआयसमोर त्याने मुलाखतही दिली. लवकरच तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडणार आहे. यामुळे केकेआरच्या संघात गंभीरची जागा द्रविड भरून काढू शकतो, अशी माहिती मिळत आहे.
द्रविड गंभीरची जागा भरून काढणार?
२९ जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना होताच द्रविड प्रशिक्षक पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राहुल द्रविडने आता मी बेरोजगार झालो असल्याचा विनोद केला होता. मात्र आयपीएलमधील अनेक संघांनी राहुल द्रविडशी संपर्क साधला आहे. केकेआरचा संघ गंभीरची जागा भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक संघाना २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी प्रशिक्षक आणि मेटाँरची गरज लागणार आहे.
Gautam Gambhir Salary : द्रविडपेक्षा गंभीरला मिळणार जास्त मानधन? जाणून घ्या, किती असेल फरक…
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदापेक्षाही अधिकचे मानधन देण्यास आयपीएलचे संघ तयार आहेत. राहुल द्रविडने २०१२ मध्ये भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. २०१४ आणि २०१५ साली तो आयपीएलमधील राजस्थान संघाचा मेटाँर होता. त्याचवेळी २०१४ साली भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना त्याने भारतीय संघाचे मेटाँरपद भूषविले होते. त्यानंतर १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याने काम केले. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना १९ वर्षांखालील संघाने २०१६ साली अंतिम फेरी गाठली तर २०१८ साली विश्वचषक जिंकला.
राहुल द्रविडचे एनसीएमध्ये स्वागत
केकेआर संघाचा निरोप घेण्यासाठी गौतम गंभीरने मागच्या आठवड्यात एक कार्यक्रम घेतला. माध्यमात आलेल्या बातम्यानुसार गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ जाणार आहे, तेव्हा गौतम गंभीर संघाबरोबर असेल, असे सांगितले जाते. दरम्यान द्रविड यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (एनसीए) भेट दिली. त्यावेळी तेथे प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंनी द्रविज यांचे स्वागत केले तसेच त्यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला.