पुणे – रोजगार उपलब्ध नाही, मिळालीच तर तटपुंज्या पगारावर काम करावे लागते. “तेच कष्ट घरच्या शेतात किंवा गोठ्यात केले तर’ या विचाराने तरुण पिढी सध्या पशुपालन व्यवसायाकडे वळताना दिसत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे हाताला काम नाही. अशा परिस्थिती पशुपालन व्यवसायात असलेल्या तरुणांसाठी पुणे जिल्हा परिषदच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “हरघर गोठे-घरघर गोठे’ ही योजना सुवर्णसंधी आहे. त्यामध्ये अद्ययावत गोठा तयार करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
“हरघर गोठे-घरघर गोठे’ ही योजना पशुपालकांसाठी फायद्याची आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्याला 35 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये 26.95 चौ.मी. (लांबी 7.7 मी आणि रूंदी 3.5 मी) आकाराचा गोठा कॉंक्रीट केलेला असेल. त्याचबरोबर गव्हाण आणि मूत्रसंचय टाकीही बाधण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकाकडे किमान सहा जनावरे (गाई, म्हैस) असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र रेषेखालील इतर कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भुसूधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्प भूधारक (एक हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेला शेतकरी), अल्प भूधारक आणि सिमांत शेतकरी यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज भरणे, जॉबकार्ड, राष्ट्रीयकृत बॅंक खाते, ग्रामसभेचा ठराव, सातबारा व 8 अ चा उतारा, जागा उपलब्धतेचा दाखला, पशुसंवर्धन अधिकारी यांचा दाखला, गटाचा चर्तुसिमादर्शक नकाशा, लाभार्थी गावचा रहिवासी असल्याचा दाखला.
“हरघर गोठे-घरघर गोठे’ ही योजना पशुपालकांसाठी आणि नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. तसेच शेळीपालन आणि कुक्कुटपालन शेडसाठीही अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्यांना त्याचा परिसरात 50 वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांनी या अर्जासाठी ग्रामपंचायत, तालुका पंचायत, तहसील कार्यालय याठिकाणी संपर्क साधावा.
– बाबुराव वायकर, सभापती कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद