पालिका आयुक्तांचा निर्णय अयोग्य; महापौरांचा आरोप
पुणे – गेल्या दीड महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा महापालिका व पोलीस प्रशासनाने काढलेल्या नवीन आदेशांमुळे सोमवारी फज्जा उडाल्याचा जाहीर आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केला. लॉकडाऊन शिथिल केल्याचे समजताच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली आणि त्याचा परिणाम म्हणजे पोलिसांना तीन ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला. त्यामुळे हे आदेश तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी महापौरांनी केली आहे.
महापौर म्हणाले, “महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळपासून शहरातील लॉकडाऊन शिथिल केल्याचे आदेश काढले. त्यात शहरातील पेट्रोल पंप, दारूची दुकाने तसेच इतर दुकाने सुरू करण्यास मनाई नसल्याचे म्हटले होते.
या आदेशामुळे शहरात सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर अजूनही करोनाचे हॉटस्पॉट केंद्र असताना लॉकडाऊन शिथिल करणे नाही. हा निर्णय घाईघाईने घेतला गेलेला आहे. यामुळे शहरात आज गर्दी झाली होती. पुण्यात अजूनही रोज करोनाचे नवीन रुग्ण सापडत असताना अशा प्रकारे निर्णय घेणे चुकीचे आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही आम्ही लॉकडाऊन शिथिल करताना ते टप्याटप्याने करावे, असे म्हटले होते. पवार यांनीही त्याला मान्यता दिली होती. पण, एका रात्रीत पूर्ण शहर सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासानाने कसा घेतला हेच समजत नाही.
शहरातील अतिरिक्त निर्बंध लागू असलेले पोलीस ठाणेनिहाय भाग
समर्थ, खडक, फरासखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, लष्कर पोलीस ठाणे अंतर्गत बंडगार्डन (ताडीवाला रस्ता, लुंबिनी नगर), सहकारनगर (तळजाई वसाहत, बालाजीनगर, धनकवडी, गुलाबनगर), भारती विद्यापीठ (अंबामाता मंदिर, कात्रज,जांभुळवाडी) दत्तवाडी (पर्वती दर्शन,शिवदर्शन, 52 चाळ पर्वती, दांडेकर पूल झोपडपट्टी, दत्तवाडी, पर्वती, इंदिरानगर झोपडपट्टी, नीलायम चित्रपटगृह परिसर), सिंहगड रस्ता (तुकाईनगर, महादेवनगर, साईनगर, खोराड वस्ती, राजीव गांधी वसाहत), कोथरूड (जय भवानीनगर, सुतारदरा, केळेवाडी, शिवतारा बिल्डींग, बधाई स्वीट, महाराजा कॉम्प्लेक्स), येरवडा (लक्ष्मीनगर, गाडीतळ, चित्रा चौक, गांधीनगर, येरवडा, नागपूर चाळ,येरवडा गावठाण), खडकी (पाटील इस्टेट, इराणी वस्ती, पाटकर प्लॉट,शिवाजीनगर रेल्वे स्थानक, उत्तर बाजून्, कामगार आयुक्त कार्यालय), विश्रांतवाडी (आदर्शनगर, इंदिरा रस्ता, फुलेनगर, जाधव वस्ती, कळस), चंदननगर (वडगाव शेरी, गणेशनगर, रामनगर टेम्पो, वडगाव शेरी), विमानतळ (कलवड वस्ती, लोहगाव) कोंढवा (एनआयबीएम रस्ता, कोंढवा परिसर, होले वस्ती, उंड्री), वानवडी (विकासनगर, घोरपडी, रामटेकडी, हांडेवाडी,काळेपडळ, रामनगर, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक-2 परिसर), मुंढवा (घोरपडी, बी.टी.कवडे रस्ता, विकासनगर), हडपसर (सोलापूर रस्ता, मिरेकर वस्ती, महात्मा फुले वसाहत, डीपी रस्ता, म्हाडा कॉलमी, हिंगणे मळा, माळवाडी, गोसावी वस्ती), बिबवेवाडी (अप्पर इंदिरानगर, सर्व्हे क्रमांक 650 , बिबवेवाडी), मार्केटयार्ड (डॉ. आंबेडकर नगर, प्रेमनगर झोपडपट्टी)