महापालिका 14 दिवसांत करणार 178 उद्यानांचे सर्वेक्षण
सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील उद्यानांचे सर्व्हेक्षण करणार आहे. क्षेत्रीय कार्यालयामार्फेत उद्यानांची तपासणी केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल 31 मे पर्यंत दक्षता व गुणनियंत्रण विभागास सादर करावा लागणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबतचा आदेश दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या बहुतेक सर्वच प्रभागांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खोदाई करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी खोदाईची कामे अजूनही सुरुच आहेत. पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. डांबरीकरणाचे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खोदाई केल्यानंतर खड्डे बुजविले गेले नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहर अभियंता राजन पाटील यांनी सर्व रस्ते व्यवस्थित बुजविण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
खोदाईमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करुन पूर्ववत करावेत, तसेच 600 मिमीच्या व्यासावरील स्ट्रॉर्म वॉटर पाईपलाईन व चेंबर्स यांची साफसफाई करावी. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन पुढील कारवाई करावी. आरोग्य विभागास स्थापत्यविभागामार्फत आवश्यकतेप्रमाणे मशिनरी उपलब्ध करुन द्यावी. रस्त्यांवरील स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्सच्या झाकणांची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करावी. पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना शहर अभियंता राजन पाटील यांनी आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना
दिले आहेत.