बंगळुरू : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगल येथून अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. बॉलिवूड कलाकारांसह अनेक बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी त्याने धमकावले होते. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला लवकरच भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून आणि खंडणीसह 200हून अधिक खटले दाखल असलेल्या रवी पुजाराला गतवर्षी जानेवारीत सेनेगल अधिकान्यांनी अटक केली होती. त्यावेळी भारताने त्याचे प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, स्थानिक न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याने तो दक्षिण आफ्रिकेत पळून गेला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि सेनेगल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला एका खेड्यातून ताब्यात घेतले.
सेनेगलला आणल्यानंतर गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणा “रॉ’चे अधिकारीही तिथे आहेत. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात रवी पुजारीने दाखल केलेली याचिका सेनेगलच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून सोमवारी सकाळी भारतात आणले जाईल, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली.
दरम्यान, रवी पुजारीवर भारतात खंडणी, हत्येसह 200 गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या 15 वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉनर्र नोटीसही जारी केली होती. बॉलिवूड कलाकार, उद्योगपतींना खंडणीसाठी धमकावल्याचे त्याच्यावर आरोप आहे. सेनेगलमध्ये रवी पुजारी अँथोनी फर्नानडीस हे नाव धारण करुन राहत होता.