अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरला अटक; ड्रग्ज प्रकरणी कारवाई

मुंबई – नारकोटिक्‍स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने मोठी कारवाई करत ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्‍बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्‍बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्‍बालला एनसीबीने अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करून ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याच कारवाईदरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचे एनसीबीच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी करावाई केल्या आहेत. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, इक्‍बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या कारागृहात आहे. या प्रकरणाची चौकशी करताना एनसीबीला टेरर फंडिंग आणि ड्रग्ज सप्लायसाठी अंडरवर्ल्ड कनेक्‍शनबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.