दाऊद अद्याप कराचीत असल्याची एझाज लाकडवालाची माहिती
नवी दिल्ली : दाऊद इब्राहिम आजही पाकिस्तानातील कराची शहरात रहात आहे. त्याचे नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठे जाळे आहे. तेथून तो बनावट चलन भारतात पसरवतो. यासाठी काठमांडूतील पाकिस्तानी दुतावासामधील काही अधिकाऱ्यांची त्याला मदत होत आहे, अशी माहिती दाऊदचा हस्तक एजाझ लाकडवालाने मुंबई पोलिसांना दिली.
मुंबई पोलिसांनी लाकडवाला याला पाटण्यातून आठ जानेवारीला अटक केली. त्याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. त्यात त्याने सांगितले, दाऊद इब्राहीमचे कराचीतील दोन पत्ते आहेत. 6ए, खायबॅन तान्झीम फेज 5 , डिफेन्स हौसिंग एरीया, कराची आणि डी -13, ब्लॉक 4, क्लिफ्टोन, कराची हे त्याचे पत्ते आहेत.
लाकडवाने दाऊदचा भाऊ अनिस आणि आणि निकटचा सहकारी छोटा शकील यांचेही पत्ते पोलिसांना दिले आहेत. हे दोघेसुध्दा संरक्षण दलाच्या वसाहतींमध्ये रहात असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
लाकडवाला याची अन्य यंत्रणाही चौकशी करत आहेत. तपासाच्या या पातळीवर आम्ही फक्त दाऊदचे अंमली पदार्थांचे रॅकेट, आणि डी कंपनीला होणारा अर्थ पुरवठा यासंदर्भात चौकशी करत आहोत, असे मुंबई पोलिसांच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लाकडवाला हा पुर्वी कॅनडात रहायचा. तो नेदरलॅंडच्या रॉटरडॅम बंदरातून आलेले अंमली पदार्थ युरोपात विकत असे. दाऊदचे अंमली पदार्थांचे रॅकेट सुरवातीला इकबाल मिर्ची सांभाळत असे. मात्र आता हा व्यावसाय छोटा शकील सांभाळतो.
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर लाकडवाला दाऊदपासून वेगळा झाला. त्याने दाऊदच्या खुनाचा दहा वर्षापुर्वी प्रयत्न केला होता. छोटा राजनचा नेमबाज विकी मल्होत्राने दाऊदला त्याच्या मुलीच्या अंत्यविधीच्या वेळी मारण्याची योजना आखली होती. मात्र, त्यावेळी दाऊद न आल्याने तो बचावला. मात्र नंतर काळात लाकडवालाचे छोटा राजनशी पैशाच्या देवघेवीवरून बिनसले आणि त्याने कंबोडीयात स्वत:ची टोळी निर्माण केली. एझाज लाकडवालाची मुलगी सोनिया ही बनावट पासपोर्टच्या सहाय्याने भारताबाहेर गेली, त्याप्रकरणाच्या तपासाची मदत एझाजच्या अटकेसाठी झाली, असे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.