अहमदाबाद – 24 वर्षांपासून फरार असलेल्या दाऊद इब्राहिमचा पंटर माजीद कुट्टी भारतात येताच गुजरात पोलिसांच्या दहशतवादी पथकाने (ATS) त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत.
माजीद कुट्टी हा दाऊद इब्राहिमचा खास समजला जातो. गेल्या 24 वर्षांपासून तो फरार होता. तो भारतात येताच दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रजून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. याआधी गुजरात एटीएसने दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणाऱ्या बाबू सोलंकीलाही अटक केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 फ्रेब्रुवारी 1996 रोजी महसाणा येथील बाॅम्बे गेस्ट हाऊसवर छापेमारी करण्यात आली होती. छापेमारीत चार किलो आरडीएक्स, 115 पिस्तूल, 750 पेक्षा जास्त कार्ट्रिज, 10 डेटोनेटरसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्यातील पिस्तूल आणि बुलेट्स हे पाकिस्तानी बनावटीचे होते. छापेमारीनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता.
जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा हा राजस्थानच्या बाडमेर आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आला हातो. हा शस्त्रसाठा मुंबई व अहमदाबाद येथे पाठवण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच कारवाई करून तो जप्त करण्यात आला होता. कारवाईनंतर मलेशियात गेलेला माजीद 24 वर्ष तेथेच होता. तो भारतात येत असल्याची गोपनिय माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच दाऊदचा उजवा हात समजला जाणाऱ्या बाबू सोलंकी याला गुजरात एटीएसने अटक केली होती. तोही गेल्या 14 वर्षांपासून फरार होता. मिळालेल्या माहितीनुसार, बाबू सोलंकी हा 2006 मध्ये झालेल्या एका गॅंगवाॅरच्या केसमधील मोस्टवाॅन्टेड आरोपी आहे.