अंडरवर्ल्ड आणि निवडणुकांचे राजकारण

– हेमचंद्र फडके 

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले त्याला आता बराच काळ लोटला आहे. आजघडीला लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींवर निरनिराळ्या, काही गंभीर गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत. इतिहासात नजर टाकली तर गुन्हेगारी जगताला नेहमीच राजकीय सत्तेचे आकर्षण राहिले आहे. मुंबई अंडरवर्ल्डनेही हे स्वप्न पाहिले होते; पण आपल्या लोकशाहीच्या ताकदीने माफियांचे हे स्वप्न साकार होऊ शकले नाही.

1960 ते 1980 च्या काळात अंडरवर्ल्डचे वर्चस्व वाढत होते. त्यावेळी देशातील राजकीय नेत्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध-लागेबांधे असणारे करीम लाला, वरदाराजन मुदलियार आणि हाजी मस्तान यांच्यापासून ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी बनलेल्या दाऊद इब्राहीमपर्यंत अनेकांनी संसदेत प्रवेश करण्याचे प्रयत्न केले; पण मतदारांच्या जागरुकतेमुळे ते विफल ठरले. या साऱ्यांमध्येही अरुण गवळीचे स्वप्न सत्यात उतरले. 1997 मध्ये त्याने अखिल भारतीय सेना स्थापन केल्यानंतर तो निवडणुका जिंकून आमदार म्हणून विधानसभेत पोहोचला. तथापि, 2012 मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. आज घडीलाही तो तुरुंगवासातच आहे.

मुंबई अंडरवर्ल्डला ग्लॅमर मिळवूून देणाऱ्या हाजी मस्तानने पहिल्यांदा राजकारणात थेट पाऊल ठेवले होते. 1984 मध्ये भिवंडी दंगलीनंतर त्याने दलित आणि मुस्लीम राजकारणाचे कार्ड खेळले होते. त्याने दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. पण हाजी मस्तानचे प्रयत्नही फोल ठरले. हाजी मस्तान त्याच्या पक्षाला मोठ्या उंचीवर किंवा व्यापक स्तरावर घेऊन जाऊ शकला नाही. तथापि, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथील स्थानिक निवडणुकांमध्ये त्याने प्रभाव टाकला. इतकेच नव्हे तर बॉलीवूडचे सुपरस्टार दिलीप कुमारही हाजी मस्तानच्या पक्षाचा प्रचार करताना दिसून आले. गुन्हेगारी जगताकडून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा या पक्षामध्ये आल्यामुळे निवडणुकांदरम्यान हाजी मस्तानने तुफान पैसा खर्च केला. निवडणुकांमध्ये पैशांचा वारेमाप वापर करण्याचा प्रघात तेथूनच सुरू झाला असे काहींचे म्हणणे आहे. 1994 मध्ये हाजी मस्तानचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या पक्षाची वासलात लागली.

अंडरवर्ल्डच्या काळ्या साम्राज्यावर “खेल खल्लास’सारखी बहुचर्चित पुस्तके लिहिणारे विवेक अग्रवाल सांगतात की, अनेक दिग्गज नेतेही खतरनाक गुन्हेगारांशी संपर्क साधून असतात. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत अंडरवर्ल्ड थेट संवाद साधत आले आहे. साधारण 2000 सालापर्यंत निवडणुकांमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव राहिला. त्यानंतर तो पूर्णपणाने संपुष्टात आला. अग्रवालांच्या म्हणण्यानुसार, एका मोठ्या राजकीय पक्षावर अंडरवर्ल्डच्या दोन चर्चित भावांना जाहीरपणाने संरक्षण देण्याचा आरोप करण्यात आला होता. तर एका पंतप्रधानांनी वरदराजन मुदलियारसारख्या डॉनच्या धारावीतील जाहीर सभेमध्ये आपल्या मुलाला आणि एका ज्येष्ठ नेत्याला पाठवले होते.

मुंबईतील डोंगरी भागातून उदयास आलेल्या दाऊद इब्राहीमच्या ताकदीचा अंदाज मोहम्मद इकबाल नतीक या पत्रकाराला आला होता. त्याने अन्य गॅंगस्टर्सना संपवण्यासाठी दाऊदचा वापर करण्याचा सल्ला पोलिसांना दिला. नतीक “राजदार’ नावाचे वृत्तपत्र चालवत होता. राजकारण, प्रशासनाची ताकद पाहून दाऊदने नतीकला 1977 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते. आपली अंडरवर्ल्डची ताकद आणि गुंडापुंडाच्या मदतीने नतीकला सहज विजयी करता येईल असा दाऊदचा होरा होता. पण नतीकला केवळ 980 मते मिळाली. पुढे जाऊन दाऊदच्या विरोधातील गॅंगने नतीकची हत्या केली.

1980 च्या दशकामध्ये दिल्लीतील राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या रोमेश शर्माने मुंबई अंडरवर्ल्डचे कनेक्‍शन थेट राजधानीशी जोडण्याचे प्रयत्न केले. मुंबईमध्ये तो वरदराजन मुदलियारच्या हाताखाली काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर रोमेश दाऊदशी जोडला गेला. दिल्लीमधील दाऊदचा माणूस म्हणून तो काम करू लागला. त्याच्यासाठी प्रॉपर्टी खरेदी करणे-विकणे इथपासून ते वसुलीपर्यंतची सर्व कामे तो करू लागला. त्याने दाऊदकडून राजकारणात करोडो रुपये लावले. पुढे जाऊन भारतीय कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पण राजकारणात येणे त्याच्यासाठी घातक ठरले. त्याच्या सर्व काळ्या कृत्यांमुळे तो पोलिसांच्या कचाट्यात अडकत गेला.

कुख्यात गुन्हेगार साधू शेट्टी दाऊदचा प्रतिस्पर्धी मोठ्या राजनच्या खास मर्जीतील होता. 1990 च्या दशकामध्ये शेट्टीने जल तुलुनाड सेना नावाचा पक्ष स्थापन केला. 1980 च्या दशकात मुंबईमध्ये आपली दहशत पसरवणारा शेट्टी 1990 च्या अखेरीस गुन्हेगारी जगताचे पाश तोडून कर्नाटकातील आपल्या पणियार या गावी निघून गेला. त्यानंतर तिथे त्याने सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मुंबईमध्ये त्याच्यावर भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले केल्याचे आरोप होते. 2002 मध्ये एकदा तो मुंबईमध्ये आला असता एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या नेतृत्त्वाखालील पोलीस चकमकीत मारला गेला. त्यावरून बरेच वादंग निर्माण झाले. कारण कर्नाटकात शेट्टीने स्वतःची वेगळी छबी तयार केली होती. तेथे तो राजकारणातही सक्रिय होऊ लागला होता. पण भूतकाळात तो गुन्हेगार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.