विमा योजना समज…गैरसमज…

आर्थिक नियोजन करताना मला एक अनुभव येतो की, कोणतीही व्यक्ती बऱ्याचदा गुंतवणूक करताना स्वतः च्या आर्थिक गरजेला महत्व देण्यापेक्षा आपापल्या सोयीप्रमाणे सोयीस्कर वाटणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. आर्थिक नियोजन तीन योजनांवर आधारित असते, बचत योजना, संरक्षण योजना, गुंतवणूक योजना यातील संरक्षण योजना म्हणजेच “विमा योजना’.
विमा योजना ही आर्थिक नियोजनातील न टाळता येणारी योजना आहे. असे म्हणतात, जे टाळता येणार नाही ते समजून घेण्यात शहाणपण असतं. विमा योजना म्हणजे नेमके काय? कोणत्या व्यक्तीला कोणता विमा घेणं, मुळात का घेणं गरजेचं आहे, हे माहीत असावं.

खरं तर खूप प्रकारच्या विमा योजना असतात. परंतु, प्रत्येक माणसाकडे सक्तीने असाव्यात अशा दोन योजना म्हणजे, जीवन विमा आणि आरोग्य विमा. विमा योजना ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक योजना नसून संरक्षण योजना आहे, हे एकदा कळले तर पुढचे समजायला सोपे जाईल.
संरक्षण योजनेमध्ये नेमके कशाचे संरक्षण? तर, आयुष्यात बऱ्याचदा अनपेक्षित वळणं येतात, तेव्हा माणसाचे आर्थिक आणि मानसिक दोन्हीही प्रकारचे नुकसान होते. अशा अनपेक्षित बदलांना अनुसरून माणूस ज्या योजनांमध्ये पैसे गुंतवतो त्याला विमा योजना म्हणतात.

बऱ्याचदा घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावर घरकर्ज, वाहनकर्ज घेतलेले असते. तसेच वयाच्या किमान 60 वर्षापर्यंत तरी व्यक्ती कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीपासून मुक्त होत नाही. त्याचबरोबर सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार कोणतेही आजार व्यक्तीला केव्हाही उद्‌भवू शकतात. अशा वेळी मोठ्या अनपेक्षित खर्चामुळे व्यक्तीचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडते. या सगळ्यासाठी विम्याची तरतूद असते. ती काही गुंतवणूक नाही. त्यामुळे गुंतवणूक योजना करताना विम्याची जागा अटळच. परंतु, प्रत्येक व्यक्तीची तिच्या वयानुसार आणि आर्थिक जबाबदारीनुसार विम्याची गरज ही वेगवेगळी असते. म्हणूनच विमा योजना ही योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानुसार योग्य तीच पण स्वतःच्या गरजांना पूरक असावी.

-सीमा जगताप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.