गोड्या जलस्रोतांची जैवविविधता अधोरेखित

सह्याद्रीच्या खोऱ्यातून माशांच्या नवीन प्रजातींचा शोध

पुणे – विस्तृत समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणात समुद्री जैवविविधतेचे अनेक हॉटस्पॉट आहेत. मात्र, याच परिसरातील गोड्या पाण्यातील जैवविविधताही तितकीच संपन्न असल्याचे पुरावे, अलीकडील काळात उपलब्ध होत आहेत. सह्याद्रीच्या खोऱ्यातून माशांच्या नवनवीन प्रजातींचा शोध लागत असून, पश्‍चिम घाटातील नद्यांची परिसंस्था ही गोड्या पाण्यातील माशांच्या विविधतेचे केंद्र असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

सागरी परिसंस्थेच्या खालवत जाणाऱ्या जैवविविधतेविषयी गेल्या काही वर्षांमध्ये जग बरेच जागरूक झाले आहे. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचीही सारखीच परिस्थिती आहे. मात्र, आपल्या हे निदर्शनास येत नाही. पर्वतांमधून उगम पावणाऱ्या गोड्या पाण्याच्या या प्रवाहांनी मानव संस्कृतीला जन्म दिला. तसेच मानवी सभ्यतेला बळकटी दिली. जरी या पाण्यामध्ये प्रवाळ खडकांसारखे वैविध्य नसले, तरी उष्ण कटिबंधीय प्रदेशातील गोड्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ जैवविविधता आढळते.

“बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे (बीएनएचएस) आणि “केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज ऍण्ड स्टडीज’च्या (केयूएफओएस) संशोधकांनी रत्नागिरीच्या काजली नदीमधून माशाच्या “डॉकिन्सिआ’ कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या शोधामध्ये वन्यजीव अभ्यासक उन्मेष कटवाटे, ज्येष्ठ सागरी संशोधक डॉ. दीपक आपटे आणि “केयूएफओएस’चे प्राध्यापक राजीव राघवन यांचा समावेश आहे.

या शोधाचे वृत्त “वर्टिब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले. त्याचप्रमाणे यापूर्वीदेखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील एका मंदिराच्या छोट्या कुंडातून “शिस्टुरा हिरण्यकेशी’ या गोड्या पाण्यातील माशाच्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले होते. गोड्या पाण्याचा पुरवठा करणारे स्त्रोतही जैवविविधतेचे भांडार असतात. मानवाबरोबरच अनेक नानाविध जीव या परिसंस्थेवर अवलंबून आहेत.

खाऱ्या पाण्यातील माशांबरोबरच गोड्या पाण्यातील माशांमध्येही वैविध्य आढळते. याच वैविध्याचा पुरावा नव्या प्रजातीच्या शोधामुळे समोर आला आहे. म्हणूनच गोड्या पाण्याचा अधिवास आणि त्यामध्ये राहणाऱ्या लाखो प्रजातींच्या संवर्धनाच्या अनुषंगाने काम करणे गरजेच असून, पश्‍चिम घाटातील वाढत्या मानवी अतिक्रमणापासून ही परिसंस्था वाचविणे आवश्‍यक असल्याचे राजीव राघवन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.