जम्मू – जम्मू काश्मीरमध्ये संबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सुरक्षा दलांनी आज 150 मीटर लांबीचे भूमिगत भुयार शोधून काढले. या भुयाराचा वापर घुसखोरांकडून घुसखोरीसाठी केला जात असल्याचा संशय आहे. “बीएसएफ’च्या जवानांनी हे भुयार शोधून काढल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महसंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी जम्मू श्रीनगर महामार्गावर नागरोटा इथे बीएसएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या ठिकाणी आढळलेल्या काही या भुयारासंदर्भातील धागेदोरे मिळाले होते. याच्या आधारे “बीएसएफ’ने हे भुयार शोधून काढले आहे, असेही दिलबाग सिंग यांनी सांगितले.
जैश ए मोहंम्मदच्या दहशतवाद्यांनी कोठून घुसखोरी केली, हे शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी या भागात मोठी शोधमोहिम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी भुयाराच्या मार्गानेच घुसखोरी केली असल्यची ठोस महिती मिळाल्यानंतर य भागातले भुयार शोधण्यास सुरुवात झाली होती.
नागरोटा इथे गुरुवारी झालेल्या चकमकीमध्ये जैश ए मोहंम्मदचे चारही दहशतवादी मारले गेले होते. हे दहशतवादी ज्या ट्रकमधून प्रवास करत होते, तो ट्रक सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.
त्यांच्या जवळ सापडलेल्या अन्य साहित्याची काळजीपूर्वक तपासणी केली असता दहशतावादी भूमिगत भुयारातून भारतीय हद्दीमध्ये घुसले असावेत, असा संशय बळावला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आज जे भुयार सापडले त्यातूनच जैश ए मोहंम्मदचे दहशतवादी घुसले का, हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही.