शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका

वादामुळे विषय समिती, प्रभाग समित्या गमावल्या

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत युती झाल्याने, महापालिकेच्या विषय समित्या आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची भेट भाजपने शिवसेनेला दिली होती. मात्र, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळेच भाजपने देऊ केलेल्या विषय समित्या घेण्यावरून पक्षात एकमत होऊ शकले नाही. तर प्रभाग समित्यांचे अर्ज भरण्याच्या अखेरपर्यंत शिवसेनेतील शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ बसू शकला नाही. त्यामुळे अखेर भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आणि दोन्ही पक्षांत महापालिकेत युती होण्याआधीच तिला तडे गेल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी भाजपच्या उमेदवारासाठी पुण्यात एकत्र येत काम केल्याने निवडणुकीनंतर शिवसेनेने केलेल्या मागणीनुसार महापालिकेत दोन्ही पक्षांची युती होईल आणि सेनेला सत्तेत सहभाग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, विषय समित्यांपाठोपाठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी भाजपने सर्वच्या सर्व जागांवर अर्ज भरले. मात्र, हे घडत असतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरीच कारणीभूत ठरली असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून महापालिकेतील गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे गटनेता पद कोणाला द्यायचे यावरून वादाचे चित्र आहे. याच पार्श्‍वभूमीवर भाजपने महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्षपदांमध्ये शिवसेनेला क्रिडा आणि विधी समिती देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शिवसेनेतील एका गटाने त्यास विरोध करत महिला-बालकल्याण आणि शहर सुधारणा या महत्त्वाच्या समित्यांसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत शिवसेनेकडून कोणतीच भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे भाजपने सर्व अध्यक्षपदासाठी अर्ज भरले. त्यानंतरच लगेचच गुरूवारी प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाले.

गटबाजीमुळे सत्तेतपासून दूर
पालकमंत्री गिरीश बापट यांनी काही प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शिवसेनेकडून नक्की कोणी चर्चा करायची असा प्रश्‍न निर्माण झाला. दोन्ही शहराध्यक्षांनी त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. तसेच, संपर्क प्रमुख बाळा कदम यांनी अखेरच्या क्षणी बापट यांच्याशी संपर्कही केला. मात्र, तोपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आल्याने सेनेला एकाही ठिकाणी अर्ज भरता आला नाही. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदामध्येही शिवसेनाला काहीच मिळू शकलेले नाही. त्यामुळे शिवसेनेला गटबाजीमुळे सत्तेत असून पदांपासून दूर रहावे लागणार असल्याचे समोर आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.