सोक्षमोक्ष: मैत्रीच्या नावाखाली “शारीरिक संबंधांना’च उधाण !

जयेश राणे

“सोळावे वर्ष उलटल्यानंतर किशोरवयीन मुलाने आणि मुलीने सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास तो गुन्हा मानला जाऊ नये. पॉक्‍सो कायद्यात तशी सुधारणा सरकारने करावी,’ अशी महत्त्वपूर्ण सूचना मद्रास हायकोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान केली. जे विदेशात अगदी सहजपणे चालू असते. तेच भारतातही गेल्या काही वर्षांपासून अगदी सहजपणे चालू आहे, हे वरील निर्णयावरूनच अधोरेखित होते. किशोरवय ते पुढील वयोमान या वेळीही या गोष्टी कशा चालू असतात याकडेही लक्षवेध करण्याचा हा आटापिटा !

ज्या गोष्टी स्त्री-पुरुष विवाहानंतर अपत्य प्राप्तीसाठी करतात, त्याच गोष्टी आजमितीस केवळ शारीरिक सुख प्राप्तीसाठी केल्या जात आहेत. यामुळेच एड्‌ससारख्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. यावरून माणसाला निरोगी राहण्यापेक्षा भोगी आणि रोगी राहणेच अधिक पसंत पडत आहे, असे विदारक वास्तव आहे. मेहनत करून कुटुंबाच्या खांद्यावरचा भार हलका करण्याचे दायित्व मुलाचे असते. मुलगी विवाह करून दुसऱ्याच्या घरी जाणार असते. सध्याच्या किती मुलांत ही जाणीव आहे? घरच्यांच्या पैशांवर मौजमजा करताना शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे एक जीवनाचा भागच बनला आहे.

आपल्या पालकांनी आपल्याला उभे करण्यासाठी किती परिश्रम घेतले आहेत? याची जाण नसल्याने असा कृतघ्नपणा केला जातो. याचा मुलगा आणि मुलगी या दोघांनीही विचार करावा. आयुष्य पुष्कळ मोठे आहे. त्यातील प्रत्येक क्षण सुख समाधानात घालवायचा म्हणजे त्यात “शरीरसंबंध’ही आलेच पाहिजे, असे वाटणे अयोग्यच! आधुनिकतेच्या नावाखाली मुला-मुलींना मिळालेले मोकळे वातावरण याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ चालू आहे. समाजव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. मुलगा असो वा मुलगी दोघांनीही किमान आपल्या पालकांचा तरी विचार करून आपण हे काय करत आहोत? याचा विचार करावा.

शिक्षणाच्या वयात शिक्षण, नंतर नोकरी-व्यवसाय, विवाह आणि पुढे कुटुंब अशी एक पद्धत आहे. आजमितीस याचे पालन होण्याचे प्रमाण किती आहे? हा प्रश्‍न आपणच आपल्याला विचारूया. विवाह जुळवताना दोन्ही बाजूंची मंडळी एकमेकांची नीट चौकशी करूनच काही दिवसांनी होकार कळवतात. स्थळ पाहण्यास गेलो आणि तिथेच होकार दिला, असे करणे म्हणजे अतिघाईचे ठरते. अशी स्थिती होण्यास हे मोकळे म्हणजे सैराट वातावरणच कारणीभूत आहे.

समाजामध्ये “सेक्‍स’ या शब्दाने कहर केला आहे. शाळा-महाविद्यालये यांतील विद्यार्थी, तसेच नोकरी-व्यवसाय करणारा वर्ग आदी सर्वांवर या शब्दाची “पकड’ आहे. अनेकजण यातच गुरफटल्याचे लक्षात येते. मोबाइलमध्ये “त्या’ गोष्टींच्या व्हिडीओ क्‍लिप ठेवणे, नेटवर “त्या’ गोष्टी पाहण्यात वेळ वाया घालवणे, सहकाऱ्यांसह गप्पा-गोष्टी करताना द्विअर्थी (डबल मिनिंग) शब्दांचा सतत उपयोग करणे, कोणत्याही मुद्द्याला पकडून अश्‍लील शेरेबाजी करणे आदी कृती सतत चालू असल्याचे अवतीभवती अनुभवण्यास मिळत असते. हे सर्व कधी थांबणार? थांबणार की नाही? असे प्रश्‍नच पडणे बंद झाले आहेत. त्यामुळे त्याच चिखलात लोळत राहण्यास समाधान वाटत आहे. समाधानही कोणत्या गोष्टीचे वाटावे? तर ज्या गोष्टी कामवासनेशी निगडीत आहेत, त्यांत अधिक लक्ष घालून विचार कलुषित केले जात आहेत.

आंब्याच्या पेटीत एक नासका आंबा असेल, तर संपूर्ण पेटीच खराब होण्यास वेळ लागत नाही. समाजामध्ये असे किती नासके आंबे आहेत? याचा आपणच विचार केला तर लक्षात येईल की, अशा नासक्‍या आंब्यांचे प्रमाणच सर्वाधिक असल्याने समाज नावाची “आंब्याची पेटी’च नासली आहे. एप्रिल-मे महिना विशेष करून आंब्यांचा महिना असतो. त्यामुळे काळानुरूप उदाहरण दिले, तर ते चटकन लक्षात येते. आता उदाहरण तर कळले, पण पुढे काय? यातून बाहेर कसे पडायचे हा मुद्दा आहेच. कारण सर्वत्र तेच वातावरण आहे.

यामध्ये एक विनम्रपणे सांगावेसे वाटते की, या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवणे महिला वर्गाला सहज शक्‍य आहे. ते कसे, ते पाहूया! शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते नोकरी-व्यवसाय करणारा वर्ग यांचा विचार करूया. ज्या स्त्री-पुरुष यांत प्रेम निर्माण होत असते त्यातील काहीजण विवाह करतात, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात, अनेक जोडीदार बदलतात, समोरच्याकडून आर्थिक लाभ मिळावा यासाठी एकत्र असतात, केवळ शरीर सुखासाठी एकत्र असतात. जे प्रेमविवाह केल्यावर समाधानी जीवन जगतात, त्यांचा काही मुद्दाच नाही. पण जे विवाहाच्या मुद्द्याशिवाय अन्य कारणांसाठी एकत्र वेळ घालवत असतात त्यांत “शरीरसुख’ हे सूत्र एकसामायिक असते.

बहुतांशपणे स्त्रीच्या तुलनेत पुरुष जास्त कामसू असतो. अशा पुरुषांकडून अनेक वेळा स्त्रियांची फसवणूक होते. विवाहाचे वचन दिले जाते आणि त्या स्त्रीकडून वारंवार विवाहाची विचारणा करणे चालू झाल्यावर तिला टाळले जाते. शारीरिक गैरफायदा घेतल्याचे लक्षात आल्यावर काही स्त्रियांची मानसिक स्थितीही बिघडते. अशा घटना समाजात सतत घडत असतात. विवाहापेक्षा विवाह न करता शरीरसुख मिळवण्याकडे अधिक कल आहे, हे कृपया स्त्रियांनी लक्षात घ्यावे. पुरुषात भावनिकदृष्ट्या अडकल्यावर त्यातून बाहेर पडणे कठीण जायचे नसेल, तर शारीरिक सुख मिळवण्यासाठी मैत्री करणाऱ्या लोकांपासून कायम अंतर ठेवूनच राहिलेले चांगले असते.

पुरुषाची नाचक्‍की होत नसते, तर स्त्रीची अधिक नाचक्‍की होते. त्यामुळे स्त्रियांनी या सूत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. मैत्रीच्या नावाखाली शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्याचे खरे रूप परिचयातील स्त्री वर्गालाही सांगितले पाहिजे अन्यथा स्त्रियांना भुरळ पाडण्यात चतुर असणारी अशी माणसे अन्य कोणा स्त्रीचे शारीरिक शोषण करून तिलाही फसवणारच! समोरच्यामध्ये व्यक्‍ती एकदा का भावनिकदृष्ट्या अडकली की तो म्हणेल तसे ती करण्यास सिद्ध असते. काहीजणी यास धीटपणे नकार देतात. मात्र, याचे प्रमाण अत्यल्पच आहे. लक्षात घ्यायचा मुद्दा हाच की, कोणत्याही वयाचे असू, कोणाकडूनही फसले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.