अग्रलेख : न्यू टीम इंडियाचा भीमपराक्रम

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला धूळ चारून पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरले. गेल्यावेळी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा पराक्रम केला होता आणि यावेळी मराठमोळा कर्णधार अजिंक्‍य राहणे याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने भीमपराक्रम करून दाखवला आहे.

 गेल्या काही वर्षांच्या कालावधीत भारतीय क्रिकेट संघासाठी विजय मिळवणे हे फारसे अप्रूप नसले तरी मंगळवारी टीम इंडियाने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि नेत्रदीपक या सर्व विशेषणांवर हक्‍क सांगणारा आहे. कारण हा नव्या टीम इंडियाचा विजय आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गुणवत्ता किती ठासून भरली आहे, हे सांगणारा हा विजय आहे. भारतीय क्रिकेट संघाची राखीव फळीही किती मजबूत आणि गुणवान आहे, हे अधोरेखित करणारा हा विजय आहे. ऐन करोना महामारीच्या काळात ऑस्ट्रेलियाचा हा दौरा सुरू झाला होता. तेव्हा जगातील दिग्गज क्रिकेटपटूंनी या मालिकेत भारताचा सपाटून पराभव होईल, असे भाकीत केले होते. 

या दिग्गज क्रिकेटपटूंचे तोंड बंद करणारा हा विजय आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या मालिकेने सुरू झालेल्या या दौऱ्यात भारताचा पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला होता. तिसरा सामना जिंकून भारताने स्वतःला सावरले होते आणि 20 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून कमबॅक केले होते. पण कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला अत्यंत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. 

विराटच्या नेतृत्वाखालील संपूर्ण संघ फक्‍त 36 धावात गारद झाला होता. अशा परिस्थितीतही भारतीय संघाने पुन्हा जोरदार कमबॅक करून मालिका विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. हा विजय नव्या टीम इंडियाचा आहे, असे म्हणावे लागते. कारण हा संघ सर्वात कमी अनुभव असलेला होता. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत होणार आणि त्याचा फटका बसणार असा निष्कर्ष तज्ज्ञ काढत असताना नव्या टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली. एक सामना अनिर्णित करून आणि एक सामना जिंकून भारताने आपले आव्हान कायम ठेवले होते. चौथ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष होते कारण गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया क्‍वचितच पराभूत झाला आहे. त्यामुळे हा सामना अनिर्णित ठेवण्यात भारताला यश आले तरी खूप झाले, असे सांगण्यात येत होते. ऑस्ट्रेलियाचा विजय की अनिर्णित सामना अशा दोनच पर्यायांची चर्चा सुरू असताना भारताने विजय मिळवून तिसरा पर्यायही खुला होता, हे दाखवून दिले. अर्थात या विजयाचे संपूर्ण श्रेय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यालाच द्यावे लागेल. 

शेवटच्या दिवशी भारताला सामना अनिर्णित ठेवण्यासाठी झुंजावे लागेल, असे वाटत असताना शुभमन गिल, ऋषभ पंत आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी भारताला विजय मिळवून दिला. गेल्या काही दिवसांत दुखापतींनी ग्रासलेल्या भारतीय संघात कर्णधार अजिंक्‍य राहणे, रोहित शर्मा आणि पुजारा यांच्याशिवाय एकही अनुभवी खेळाडू नव्हता. या मालिकेतील चारही सामने खेळण्याचा अनुभव फक्‍त राहणे आणि पुजारा यांना होता. जसप्रीत बुमराह, मोहंमद शमी, उमेश यादव, अश्‍विन, रवींद्र जडेजा हे गोलंदाज उपलब्ध नव्हते. फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला विराट कोहली संघात नव्हता. तिसऱ्या सामन्यात चिवट फलंदाजी करून सामना अनिर्णित ठेवणारा हनुमा विहारी चौथ्या सामन्यात नव्हता. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने या संघाचे वर्णन “अर्धा भारतीय संघ’ असे केले होते. या संघाला जर पराभवाचा सामना करावा लागला असता तर कोणालाही काही वाटले नसते, पण टीम इंडियाच्या या नव्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य या निमित्ताने समोर आले आणि या टीम इंडियाला सहजासहजी पराभव पत्करणे मान्य नाही हेही सिद्ध झाले. 

एका दिवसाच्या खेळात चौथ्या डावात 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग यशस्वीपणे पूर्ण करणे नेहमीच कठीण असताना धावांचा असा पाठलाग करताना अनेक संघाना पराभवच पत्करावा लागल्याची आजवरची उदाहरणे आहेत. विशेषतः दुसऱ्या देशात परक्‍या मैदानावर असा पाठलाग करणे अधिकच अवघड असते. त्यामुळे भारतीय संघ सामना अनिर्णित ठेवण्याचाच प्रयत्न करेल असे वाटत होते. पहिले दोन सत्रे सावधपणे खेळून काढल्यावर तिसऱ्या सत्रात 37 षटकात 145 धावा करण्याचे आव्हान भारतीय संघापुढे होते. तिसरे सत्रही सावधपणे खेळून सामना अनिर्णित ठेवण्याचा भारतीय संघाचा मनसुबा असेल, असे वाटत असतानाच शेवटच्या 10 षटकात ऋषभ पंतने सामन्याचा चेहरामोहरा बदलून भारताला अशक्‍यप्राय विजय मिळवून दिला. जरी हा सामना अनिर्णित राहिला असता तरी मालिका बरोबरीत सुटल्याने बॉर्डर-गावसकर चषक भारताकडे राहिला असता, पण ते निर्भेळ यश म्हणता आले नसते. म्हणूनच हा चौथा सामना जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित केले आणि आधुनिक क्रिकेटमधील बॉस कोण आहे, हे दाखवून दिले. 

सिराज, नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर या नव्या दमाच्या गोलंदाजांनी आपली उपयुक्‍तता सिद्ध केली. ऋषभ पंत क्रिकेटकडे गांभीर्याने पाहात नाही अशी टीका होत असताना त्याने सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज होण्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू ठेवल्याचे या विजयाने सिद्ध झाले. भारतातील आयपीएल किंवा प्रथमश्रेणी क्रिकेटचे महत्त्वही यानिमित्ताने समोर आले. भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार असल्याची टीका होत असतानाच आयपीएलच्या अनुभवामुळेच ऋषभ, गिल, शार्दुलसारखे खेळाडू भारताला विजय मिळवून देऊ शकले हेही नाकारता येणार नाही. या विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समिती यांची जबाबदारी वाढली आहे. 

प्रमुख खेळाडू संघाबाहेर असल्याने ज्या राखीव खेळाडूंनी आपली उपयुक्‍तता सिद्ध केली आहे त्या खेळाडूंना भविष्यातही चांगली संधी देण्याचे धोरण ठेवावे लागेल. प्रमुख खेळाडू संघात परतले की या खेळाडूंकडे दुर्लक्ष होता कामा नये. भारताचे किमान तीन राष्ट्रीय संघ तयार होऊ शकतात अशी गुणवत्ता उपलब्ध असल्याने अशा गुणवत्तेचा सन्मान करावाच लागेल. गाबाच्या मैदानावरील या ऐतिहासिक विजयाने कसोटी विजेतेपद स्पर्धेतही भारताची दावेदारी कायम राहिली आहे. म्हणूनच रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाचे मनापासून अभिनंदन. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.