#U19CWC : ‘भारत-पाक’मध्ये होणार ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

पोटचेफस्टरूम (दक्षिण आफ्रिका) : ज्या लढतीची संपूर्ण क्रिकेटविश्वाला प्रतीक्षा असते, ती भारत आणि पाकिस्तानमधील लढत अखेर युवा विश्वचषक स्पर्धेच्या (१९ वर्षाखालील) उपांत्य फेरीत होणार असून, आज (मंगळवार , दि. ४ रोजी, दुपारी १.३० वा.) पोटचेफस्टरूम येथे होत असलेल्या या लढतीसाठी उत्कंठा शिगेला पोहचली आहे. भारताचा कर्णधार प्रियम गर्ग आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक कर्णधार रोहेल नाझीर या दोघांनीही आपणच अंतिम फेरीत पोहचण्याचे दावे केले आहेत. दुसरा उपांत्य सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात ६ फेब्रुवारीला होईल.

https://twitter.com/cricketworldcup/status/1223289903364091904?s=19

भारताने आजवर वर्ष २०००, २००८, २०१२ आणि २०१८ असे चारवेळा विजेतेपदावर आपले नाव कोरलेले आहे तर पाकने वर्ष २००४ आणि २००६ मध्ये हा चषक जिंकला आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत जाऊन या विश्वचषकावर कोणता संघ दावा सांगणार , हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या स्पर्धेत भारताने साखळी फेरीत श्रीलंकेला, जपानला, न्यूझीलंडला तर उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाला ९० धावांनी पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तानने स्काॅटलंडला, झिम्बाब्वेला आणि अफगाणिस्तानला हरवले आहे. त्यांच्या बांगलादेश विरूध्दच्या सामन्यावर पावसाचे पाणी पडले.

भारत-पाक युवा संघादरम्यान यापूर्वी झालेल्या ५ पैकी ४ लढती  भारताने जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये वर्ष २०१९ च्या आशिया चषकामध्ये भारताने ६० धावांनी, वर्ष २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेत २०३ धावांनी, वर्ष २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत ४० धावांनी आणि २०१४ च्या आशिया चषक स्पर्धेतही ४० धावांनी पाकिस्तानवर मात केलेली आहे. तर वर्ष २०१३ मध्ये आशिया चषकात पाकिस्तानने भारतावर २ विकेटसनी मात केली होती.

या स्पर्धेत सलग १० विजय नोंदविण्याचा विक्रमही भारताच्याच नावावर असून वर्ष २००८ ते २०१० च्या दरम्यान त्यांनी ही कामगिरी नोंदविली होती. क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान लढतीला सर्वाधिक महत्व असते. अशा सामन्यांवर मोठा सट्टाही लावला जातो आणि समाज माध्यंमामध्ये लढतीविषयी तीव्र व तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळतात. आता पोटचेफस्टरू लढतीत भारत जिंकतो की पाकिस्तान, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.