पुणे : पहिली अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 1988 मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ चॅम्पियन ठरला. यानंतर 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेत 10 वर्षांनंतर अंडर-19 विश्वचषकाची दुसरी आवृत्ती खेळली गेली. 1998 पासून दर दोन वर्षांनी अंडर-19 विश्वचषकाचे आयोजन केले जाते. भारताने चार वेळा विजेतेपद पटकावले असून शेवटची स्पर्धा बांगलादेशने जिंकली होती. सध्या या स्पर्धेची 14वी आवृत्ती वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जात आहे.
अंडर-19 वर्ल्डकपमध्ये असे अनेक खेळाडू होते जे कदाचित या स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळले नसतील, पण नंतर वरिष्ठ स्तरावर त्यांना राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाची संधी मिळाली. या लेखात, अशा 3 खेळाडूंची चर्चा करणार आहोत, जे खेळाडू म्हणून 2006 अंडर-19 विश्वचषक खेळल्यानंतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे कर्णधार बनले आहेत.
1) रोहित शर्मा
रोहित शर्मा अंडर-19 विश्वचषक स्पर्धा 2006 मध्ये भारतीय संघाचा भाग होता. रोहित या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणार्या खेळाडूंच्या यादीत चेतेश्वर पुजारा आणि गौरव धीमान यांच्या नंतर तिसर्या स्थानावर होता. शर्माने 6 सामन्यात 41.0 च्या सरासरीने आणि 77.35 च्या स्ट्राईक रेटने 205 धावा केल्या. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 78 होती. भारतीय संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. पण अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या अंडर-19 संघाकडून पराभव झाला.
रोहित शर्मा हा सध्याच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि गेल्या वर्षीच त्याला भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार बनवण्यात आले आहे.
2) किरॉन पोलार्ड
स्फोटक फलंदाजांपैकी एक किरॉन पोलार्ड 2006 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. या स्पर्धेत लिओन जॉन्सनने वेस्ट इंडिजच्या अंडर-19 संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाने एकूण 5 सामने खेळले. या सर्व सामन्यांमध्ये किरॉन पोलार्ड हा वेस्ट इंडिजच्या संघाचा भाग होता. मात्र, अंडर-19 विश्वचषक 2006 मध्ये किरॉन पोलार्डने 5 सामन्यांच्या 4 डावात फलंदाजी करताना केवळ 19 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 11 होती. याशिवाय त्याने 2 डावात गोलंदाजी करताना 2 बळीही घेतले. तथापि, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी केली आणि सध्या तो आपल्या देशाचे टी20 आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व करत आहे.
3) तमीम इक्बाल
तमिम इक्बालने अंडर-19 विश्वचषक स्पर्धे 2006 मध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत बांगलादेशच्या अंडर-19 संघाचे नेतृत्व मुशफिकुर रहीमने केले. मात्र, त्यांच्या संघाला ही स्पर्धा जिंकता आली नाही. तमिम इक्बालला अंडर-19 विश्वचषकात 5 सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला 13.2 च्या सरासरीने केवळ 66 धावा करता आल्या. युगांडा अंडर-19 संघाविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. या सामन्यात त्याने 54 चेंडूत 39 धावा केल्या.
तमिमने या स्पर्धेत फारसे योगदान दिले नसले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि बांगलादेशच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो. सध्या तमीम बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे.