सविंदणे (वार्ताहर ) – कवठे येमाई ता. शिरूर येथील दोन युवक आपल्या नातेवाइकांच्या लग्नासाठी लोहगाव, पुणे येथे गेले होते. त्या लग्नामध्ये नवरा, नवरी, फोटोग्राफर सह एकूण 50 जणांना कोरोना ची बाधा झाली होती. त्यामुळे कवठे येमाई येथील अठरा आणि वीस या वयोगटातील दोन युवकांचे दिनांक सात रोजी स्वॅब घेण्यात आले होते. दरम्यान, त्याचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आल्याची माहीती कवठे येमाई ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय आधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिली आहे.
त्यामुळे कवठे येमाई गावात एकच खळबळ माजली आहे. त्या दोन युवकांच्या संपर्कामध्ये परिसरातील अनेकजण आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी कवठे गावांमध्ये पाच जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच आता नव्याने दोघांची भर पडल्यामुळे कवठे गावावर कोरोनामुळे भयभीत वातावरण झाले आहे.
नागरिकांनी सध्या बाहेर गावी जाणे टाळावे. कवठे गाव नागरीकांनी स्वतःहून काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच फवारणी सुरू केली आहे.कोणीही घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालय संपर्क साधावा.
-दिपक रत्नपारखी, माजी सरपंच कवठे येमाई