अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थी त्रस्त; विद्यार्थ्यांकडे महापालिका शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
पिंपरी – बारावीची परीक्षा संपून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र, परीक्षा सुरू होताच शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. परीक्षा केंद्रांवरील अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांनी विद्यार्थी पहिल्याच दिवशी त्रस्त झाले आहेत. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे.
वास्तविक पहाता परीक्षाकेंद्रांवर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर असते. पिंपरी चिंचवडमधील अनेक परीक्षा केंद्रांवर उलट परिस्थिती दिसून येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा बुधवारी पहिला पेपर होता. परंतु ऐन परीक्षेच्या काळात मुलांना अस्वच्छता तसेच दुर्गंधीचा सामना करावा लागला.
बहुतांश शाळांतील वर्गखोल्यांमध्ये अस्वच्छता आहे. तसेच उन्हाचा चटका वाढलेला असताना काही ठिकाणी पखें तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आधीच मुलांना परीक्षेचे टेन्शन त्यात या असुविधांमुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या अस्वच्छतेमुळे व अपुऱ्या सोयी सुविधांमुळे विद्यार्थी आजारी पडले तर त्यांना कदाचित परीक्षेला मुकावे लागेल. अशी भीती पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्रातील शाळा व्यवस्थापनाने तात्काळ शाळांतील वर्गखोल्यांची साफसफाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
शहरातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर भौतिक सुविधादेखील नाहीत. काही केंद्रांत बसण्याची व्यवस्था नीट नाही. या प्रकारानंतर शिक्षण विभागाच्या कारभारावर पालकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना अनेक अटी शर्थीचे पालन करण्यास भाग पाडले जाते. मात्र, महापालिका शिक्षण विभाग व संबंधित परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे साफ दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अस्वच्छता व दुर्गंधी यासारख्या अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असून, शिक्षण विभागाने कमीत कमी परीक्षा काळात विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्यात तसेच परीक्षा केंद्रामध्ये स्वच्छता करावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
केंद्राची निवड करताना भौतिक सुविधा आहेत की नाही ते बघितले जाते. खिडक्या, इमारती तसेच वर्गखोल्या सुस्थितीत असल्याची पाहणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून केंद्राची निवड केली जाते. सर्व निकषानुसार केंद्राची निवड करण्यात आली आहे. संबंधित तक्रारींची शहानिशा करण्यात येईल. सर्व केंद्रांवर भौतिक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत.
– पराग मुंडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग