काका शिवपाल यांना पुतण्याशी घ्यायचेयं जुळवून

आग्रा  – प्रगतीशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल यादव यांनी समाजवादी पक्षाशी (सप) आघाडी करण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे काका शिवपाल हे त्यांचे पुतणे आणि सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी जुळवून घेण्याच्या मुडमध्ये असल्याचे सूचित झाले आहे.

उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्या राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अशात सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे बंधू असणाऱ्या शिवपाल यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. उत्तरप्रदेशात भाजपच्या पराभवाची निश्‍चिती हे आमचे उद्दिष्ट आहे.

त्यादृष्टीने आघाडी करण्यासाठी आमचे प्राधान्य सपला राहील. इतर धर्मनिरपेक्ष पक्षांशीही आमची हातमिळवणी होऊ शकते, असे ते बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. काही वर्षांपूर्वी शिवपाल आणि अखिलेश या काका-पुतण्यांमधील मतभेद उफाळून आल्याने सपमध्ये यादवी सुरू झाली.

सपचा ताबा अखिलेश यांच्याकडे गेल्यानंतर शिवपाल यांनी स्वतंत्र वाट धरली. त्यांनी 2018 मध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. आता ते मागील काही दिवसांपासून पुन्हा समेटाची भाषा बोलत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.