अनधिकृत विद्यार्थ्यांचा ‘राडा’

कठोर कारवाईच्या नुसत्याच गप्पा : आता अंतर्गत चौकशी करणार


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतिगृहातील प्रकार


विद्येच्या माहेरघराला आणखी एक गालबोट


कारवाई न करताच पोलिसांनी सोडून दिले

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाच नंबर वसतिगृहात अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दारू पिऊन धिंगाणा घातला. तसेच प्रथम वर्षाच्या मुलांना धमकावून त्रास देण्याची घटना घडली. या प्रकाराने विद्येच्या माहेरघराला आणखी एक गालबोट लागले आहे.

विद्यापीठाने अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे वसतिगृहातील काही खोल्या या मोकळ्या केल्या आहेत. त्या कुलूपबंद असूनही कुलूप तोडून काही विद्यार्थ्यांनी पाच नंबरमधील वसतिगृहात काल रात्री “पार्टी’ केली. त्यांच्या धिंगाण्यामुळे त्रस्त झालेल्या इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांना कोणत्याही कारवाईविना सोडून देण्यात आले.

विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांनी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतलेली नाही. हे विद्यार्थी अवैधरित्या वसतिगृहात राहात होते. त्यांनी काल रात्री एका विद्यार्थ्याला त्रास दिल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याला रात्रीच आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले होते. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मद्यपान करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वसतिगृहात अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे चिडलेल्या मुलांकडून असे प्रकार सुरू आहेत.

मात्र, शिक्षणासाठी विद्यापीठात आलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची अंतर्गत चौकशीदेखील सुरू केली आहे. विद्यापीठ वसतिगृहात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ

Leave A Reply

Your email address will not be published.