महापालिकेच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर

माहिती अधिकारात उघड ः कंपन्यांकडे 22 कोटी 43 लाखांची थकबाकी

पिंपरी – शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची 22 कोटी 43 लाखांचा मालमत्ता कर थकविला आहे. यामध्ये अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. संत तुकारामनगर येथील महापालिका मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे, अशी माहितीही उघड झाली आहे.

माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांना मिळालेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 22 लाखांच्या घरात गेली आहे. येथील नागरी वस्त्यांमध्ये वाढ होत असल्याने चांगली सेवा पुरवून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी सध्या शहरांकडे मोर्चा वळवला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मोक्‍याच्या ठिकाणी, मोठ्या इमारतींच्या गच्चीवर टोलेजंग मोबाईल टॉवर उभारले आहे. मात्र, शहरातील विविध इमारतीवर उभारण्यात आलेल्या एकुण 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवरधारक कंपन्यांनी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही.

मोबाईल टॉवर उभारताना किरणोत्सर्ग स्तरही तपासावा लागतो. एका ठिकाणी किती टॉवर असावेत, निवासी इमारतीपासून ते किती दूर असावेत ?, त्याचेही निकष असतात; परंतु कुणीच हे निकष पाळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक अवैध इमारतींवरही अनधिकृत टॉवर असून, अशा प्रकारचे टॉवर अधिकृत होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. काही मोठ्या हौसिंग सोसायट्यांनीही अनधिकृतपणे टॉवर उभारले आहेत.

दोन वर्षांपूर्वी असे अनधिकृत टॉवर महापालिकेने सील केले होते. मात्र, मोबाईल कंपन्यांनी न्यायालयातून स्थगिती आणली होती, असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. संत तुकारामनगर येथील महापालिका मालकीच्या इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. त्याचीही 1 लाख 70 हजार रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, मोबाईल टॉवर्सकडून थकबाकी वसूल केली जाणार असून थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

अनधिकृत टॉवर असलेल्या कंपन्या

अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीमध्ये एअरटेलचे 65 टॉवर, आयडियाचे 56, रिलायन्सचे 55, इंडसचे 41, व्होडाफोनचे 35, टाटाचे 24, तर बीएसएनएलचे 15 आदी मोठ-मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. याही कंपन्या थकबाकीत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.