सिंहगडरस्ता, दि. 2 (प्रतिनिधी) -पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबावर टाकून डीटीएच इंटरनेटच्या केबल अनधिकृतपणे टाकण्यात आल्याने सिंहगड रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. सिंहगड रस्त्यावर अभिरुची ते मधुकोष या सोसायटीदरम्यान अशा केबल क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाने तोडल्या. यापुढेही ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सिंहगड रस्ता परिसरात सध्या सर्वत्र अनधिकृत केबलचा गुंता वाढला आहे. पालिकेची कोणतेही परवानगी न घेता सर्रासपणे विद्युत खांबावरून इमारतीवरून झाडांवरून जेथे जागा मिळेल तेथे अशा केबलचे जाळे पसरले आहे. अनधिकृतपणे टाकलेल्या केबलमुळे परिसराचा बकालपणा वाढला आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयाचे विद्युत विभागाचे अभियंता सूर्यभान जाधव यांनी सांगितले की, अधिकृतपणे टाकलेल्या केबलचा सर्वत्र गुंता वाढला आहे. सिंहगड रस्त्यावरही विद्युत खांबावर केवळ टाकल्याचे दिसून आले, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. केबलवर नाव नसल्यामुळे त्या मालकाचे नाव समजत नाही, त्यामुळे नोटीस देता येत नाही. आता, ही कारवाई महापालिकेतर्फे वारंवार करण्यात येईल.
7400 कि.मी केबलचे जाळे
महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी या केबलचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार पुणे शहरांमध्ये 7400 कि.मी. एवढ्या लांबीची केबल अनधिकृतपणे टाकण्यात आल्याचे आढळून आले, त्याबाबतचा दंड आणि आकार याची रक्कम कोट्यवधीच्या घरात आहे. पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की, यासंदर्भात निर्णयाचा प्रस्ताव आम्ही आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.