मुंबई – मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) नोंदणीकृत पंचांना तसेच गुणलेखकांना क्रिकेट बंद असल्याने सध्या काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले असून त्यांना संघटनेने तसेच माजी पंचांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
भारतीय क्रिकेटची पंढरी मानली जात असलेल्या मुंबईत आंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक क्रिकेटही बंद असल्याने काही पंचांवर आर्थिक भार कसा पेलायचा याचा तणाव आला आहे. गुणलेखकाला प्रत्येक सामन्याचे 1500 रुपये तर पंचांना प्रत्येक दिवसाचे 2000 रुपये मानधन म्हणुन मिळतात. क्रिकेट थांबल्याने हे मानधनही थांबले आहे. त्यातच एप्रिल व मे महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटचे सामने जास्त खेळले जातात. मात्र, करोनामुळे स्थानिक क्रिकेट बंद आहे.
पंचाचे काम करणाऱ्या पंचांवर व गुणलेखकांच्या कमाईवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांना मदत म्हणुन संघटनेचे माजी पंच त्यांना आर्थिक सहकार्य करत आहेत. माजी पंचांनी सक्रिय असलेल्या पंचांसाठी अडीच लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. संघटनेशी जोडल्या गेलेल्या 47 पंच तसेच 15 गुणलेखकांना प्रत्येकी 3000 रुपये देण्यात आले आहेत.