छत्री

4.30 वाजताची मिटिंग कमीत कमी 6 पर्यंत चालणार होती. आज दुपारपासूनच आकाशात ढग जमू लागले. संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता वेधशाळेनेही नोंदवली होती. या पहिल्या पावसाची सर्वचजण वाट पाहात होते. मी तर इतकी आसुसली होते की, तो क्षण मला अनुभवयाचा होता.

अखेरीस मिटिंग सुरू असतानाच 5 च्या दरम्यान वारे वाहू लागले. झाडे हलू लागली. धुराळा उडू लागला आणि येणार येणार म्हणून वाजत गाजत तो पाऊस अखेरीस अगदी समीप आला. आता कोणत्याही क्षणी ते टपोरे थेंब मातीत मिसळणार होते. माझं खरं तर मिटिंगमध्ये लक्षच नव्हतं. मी सारखी खिडकीतून बाहेर बघत होते. तेवढ्यात लाईट गेले. अचानक अंधारून आलं. आकाशात ढगांची गर्दी झाली. विजा चमकू लागल्या. ढगांच्या गडगडाटाने मनात एक अनामिक भीती दाटून आली आणि मिटिंग आवरती घेत बॉसने घरी जाण्याची सर्वांनाच परवानगी दिली. ऑफिसमधून बाहेर पडेपर्यंत तो आला. त्याला पाहिले, अनुभवले आणि तो जिंकला. जोराने गर्जना करीत तो कोसळू लागला. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून, अर्धवट भिजत मी तो क्षण अनुभवत राहिले.

तो आला आहे हे कळताच कोपऱ्यात बसलेली ‘ती’ चटकन उभी राहिली. आपली रंगीबेरंगी, कधी प्लेन असणारी साडी सावरत, झटकून देत, बटण दाबल्यानंतर सर्वांग झटकत ती उभी राहिली. तो कोसळत राहिला. पण तो जेव्हा येतो तेव्हा तिची गरज सर्वांनाच असते. हे त्याला कळून चुकलंय.

तिच्या तऱ्हा तरी किती! पर्समध्ये बसण्यासाठी छोटी झालेली, पिशवीत राहण्यासाठी मध्यम आकाराची आणि पूर्वीच्या काळी तर हातात काठी धरून चालण्यासारखी आधार देणारी, पण सांभाळण्यास मात्र कठीण. ती आपल्या डोक्‍यावर धरली तर संरक्षण देणारी. तिच्यावरून ओघळणाऱ्या थेंबामध्ये मोत्याचं तेज देणारी विविध रंगांची आणि आकाराची. तो जसा चारच महिने येतो आणि उरलेले आठ महिने आपण त्याची आठवण काढतो. तशी ही सुद्धा फक्‍त तो येतो तेव्हाच बाहेर पडणारी. नाहीतर कोपऱ्यात राहून त्याची सदैव वाट पाहणारी.

दुसरी कोणी नाही हो… ही तर आपली लाडकी ‘छत्री’. जी नेहमी विसरली जाते, हरवली जाते, कधी कधी दुसऱ्याकडे मागण्याची वेळ येते. पण संरक्षण खात्याची प्रमुख आहे बरं का ती. तेव्हा पाऊस कितीही पडो छत्रीशिवाय पर्याय नाही… नाही का?

– आरती मोने

Leave A Reply

Your email address will not be published.